नागरिकांनी विकासकामे पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावं

मांद्रे मतदारसंघाचे आमदार तथा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटेंचं आवाहन

मकबूल | प्रतिनिधी

पेडणेः मांद्रे मतदारसंघात अनेकविध सोयी सुविधाचा अभाव असून त्या उपलब्ध करण्याकामी माझे प्रयत्न आहेत. मात्र नागरिकांनी विकासकामे पूर्ण करून घेण्यासाठी सहकार्य करावं, असं आवाहन मांद्रे मतदारसंघाचे आमदार तथा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटेंनी केलं. हरमल येथील कार्मेल चर्च मैदानात फ्लडलाईट सुविधाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते.

दोन महिन्यात 7 लाख रुपये खर्चून मैदानात वीज सुविधा निर्माण करणार

आगामी दोन महिन्यात अंदाजे 7 लाख रुपये खर्चून मैदानात वीज सुविधा निर्माण होईल. त्याचा फायदा युवा खेळाडूंच्या प्रगतीसाठी होईल, असं सोपटे म्हणाले. आगामी काळात पर्यटन महामंडळातर्फे गोव्यात अंदाजे 35 हायमास्ट घालण्याचं निश्चित केलं आहे. सध्या नागरिक आणि संस्थांच्या मागणीनुसार आणखीन ज्यादा हायमास्ट, फोर आणि सिक्स आर्म टॉवर सुविधा देण्यात येईल, असंही सोपटेंनी नमूद केलं. मांद्रेतील जनतेस प्राधान्याने सुविधा देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. त्याचा लाभ मांद्रेवासीयांनी करून घ्यावा. चर्च संस्थेच्या माध्यमातून फा. फर्नांडिस यांनी चर्च आवारात दोन टॉवरची गरज असून शक्य असल्यास महामंडळातर्फे सोय करण्यात यावी अशी विनंती केली. ती मागणी लवकरच पूर्ण करू, असं आश्वासन सोपटेंनी दिलंय.

मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम

या कार्यक्रमाला पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक आणि हरमलच्या माजी सरपंच सूचना गडेकर, संचालक सुदेश सावंत, सरपंच मनोहर केरकर, उपसरपंच बेर्नांर्ड फर्नांडिस, पंच मनीषा कोरकणकर, अनंत गडेकर, इनासियो डिसोझा, माजी पंच दिलीप वस्त, चर्चचे फादर लिन रोलँड फर्नांडिस, कार्यकर्ते राफायल फर्नांडिस आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी पंच इनासियो डिसोझा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!