जनसुनावणीवेळी दक्षिण गोव्यातील नागरिक आक्रमक

रांगेत असतानाही बोलण्यासाठी नावे पुकारली जात असल्याने लोक संतापले

अजय लाड | प्रतिनिधी

मडगावः दक्षिण गोव्यातील सीझेडएमपी जनसुनावणीवेळी नागरिक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. सकाळपासून नाव नोंदणी करण्यासाठी एसजीपीडीए मार्केट नजीक नागरिकांच्या मोठ्या रांगा पाहावयास मिळाल्या. सुमारे दोनशे ते तीनशे लोक नोंदणीसाठी रांगेत उभे असतानाच जनसुनावणीसाठीचे सादरीकरण सुरू करण्यात आलं. या प्रकारानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी सीझेडएमपी जनसुनावणीच्या प्रक्रियेवर आक्षेप दर्शवत जिल्हाधिकारी रुचिका कटियाल घेराव घालत या प्रकाराबाबत विचारणा केली. सर्व नागरिक मंडपात आल्यानंतरच जनसुनावणीला सुरूवात करण्याची मागणी घटनास्थळावरील नागरिकांकडून करण्यात आली.

सर्व लोकांना मते मांडायला देण्यात येतील

जनसुनावणीसाठी बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव हे उपस्थित होते. तसंच पोलिसांचाही कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. सादरीकरण पूर्ण झाल्यावर एकेका वक्त्याचं नाव पुकारण्यात येऊ लागलं. वक्ता उपस्थित नसल्यास तत्काळ दुसऱ्या वक्त्याचं नाव पुकारण्यात येत होतं. पुकारण्यात येत असलेले वक्ते रांगेत असल्याचं सांगत नागरिकांनी पुन्हा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर जिल्हाधिकारी कटियाल यांनी सर्व नागरिकांना मते मांडण्यास देण्यात येतील असं स्पष्ट केलं.

नाराजी व्यक्त करत प्रभुदेसाई यांनी व्यासपीठ सोडलं

वक्ते अभिजीत प्रभुदेसाई यांनी जनसुनावणीची ही वेळ योग्य नाही तसंच आराखडा तयार करताना ग्रामस्तरावर केलेल्या सूचना लक्षात घेण्यात आलेल्या नाहीत असंही दाखवून दिलं. प्रभुदेसाई यांनी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या चहापानाची आणि जेवणाबाबतची कोणती सोय केलेली आहे आणि त्यांना कधी बोलायला मिळेल याबाबतची माहिती विचारली. अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. त्यानंतर नाराजी व्यक्त करत प्रभुदेसाई यांनी व्यासपीठ सोडलं.

हेही वाचाः CRIME UPDATE | हसन खान खून प्रकरण: सहा महिन्यात खटल्याची सुनावणी पूर्ण करा

गावागावात जाऊन लोकांची मते जाणून घ्यावी

आमदार चर्चिल आलेमाव यांनी ज्याप्रमाणे ग्रामस्तरावर आराखडा तयार करण्यात आले त्याचप्रमाणे गावागावात जाऊन लोकांची मतं लक्षात घ्यावीत अशी मागणी उपस्थित अधिकाऱ्यांकडे केली. जनसुनावणीसाठी नोंदणी करण्यासाठी अजूनही मंडपाबाहेर लोकांची गर्दी आहे. तर वक्ते मतं मांडताना या जनसुनावणी विरोधात आक्षेप घेत आहेत. आप, रिव्होल्युशनरी गोवन्स, गोवा फॉरवर्ड यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनीही ही जनसुनावणी चुकीच्या वेळी घेत असून करोनाचा संसर्ग वाढल्यास राज्य सरकार जबाबदार राहील असं मत व्यक्त केलं आहे.

उत्तरेत कांपाल परेड मैदान, तर दक्षिणेत एसजीपीडीए मैदानावर जनसुनावणी

‘जीसीझेडएमपी’ अर्थात गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यासाठी आजपासून नव्याने जनसुनावणीस सुरुवात झालीये. दरम्यान दक्षिण गोव्यात लोकांनी आक्रमक पवित्रा घेतला. उत्तरेत कांपाल परेड मैदान, तर दक्षिणेत एसजीपीडीएच्या मैदानावर ही जनसुनावणी सुरू आहे.

हेही वाचाः गोव्याचा घात करणाऱ्यांना नैसर्गिक न्याय मिळाला

२५४ आराखड्यांवर हरकती एकून घेतल्या जाणार

राष्ट्रीय हरित लवादाकडून दणका मिळाल्यानंतर सरकारने अखेर ‘जीसीझेडएमपी’ जनसुनावणी गुरुवारी ठेवली. 7 मार्च 2021 रोजीची जनसुनावणी रद्दबातल ठरविल्यामुळेच सरकारवर फेर जनसुनावणीची वेळ ओढवली. किनारी भागांच्या शाश्वत विकासासाठी प्रत्येक राज्याला किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा तयार करणं बंधन आहे. या आराखड्यानुसारच भविष्यात किनारी क्षेत्रात विविध प्रकल्पांना मान्यता दिली जाऊ शकते. या सुनावणीवेळी २५४ आराखड्यांवर हरकती एकून घेतल्या जाणार आहेत. तर आतापर्यंत तब्बल ५ हजारपेक्षा जास्त लेखी हरकती सादर झाल्या आहेत. दरम्यान, या सुनावणीचं चित्रण करुन ठेवण्याचा आदेशही लवादाने दिला आहे.

हा व्हिडिओ पहाः LIVE | GCZMP | जनसुनावणीचं थेट प्रक्षेपण

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!