विर्डी-तळेखोलमार्गे महाराष्ट्रातील नागरिकांचा गोव्यात प्रवेश

कोविड निगेटिव्ह सर्टिफिकटशिवाय गोव्यात एंट्री; केरी सरपंचाकडून खंत व्यक्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपईः परराज्यातून गोव्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांसाठी कोविड प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलंय. यासाठी सरकारने वेगवेगळ्या तपासणी नाक्यावर खास अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. परराज्यातील नागरिक विनाप्रमाणपत्र गोव्यात प्रवेश करणार नाहीत, याची विशेष खबरदारी सरकारतर्फे घेण्यात येतेय. मात्र महाराष्ट्रातील नागरिक कोविड प्रमाणपत्राशिवाय केरी भागातून गोव्यात प्रवेश करत असल्याची बाब समोर आलीये.

हेही वाचाः CORONA UPDATE | रुग्णसंख्या बरे होण्याचा दर 90.71 टक्के

रुग्णसंख्या वाढल्यास सरकार जबाबदार

या प्रकरणाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन विर्डी मार्गावर नाकाबंदी करण्याची मागणी केरी पंचायतीचे सरपंच दावूद सय्यद यांनी केली आहे. केरी भागांत रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास याला सरकारच जबाबदार राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे याकडे त्वरित गांभीर्याने लक्ष द्यावं आणि असे प्रकार घडू नयेत म्हणून काळजी घ्यावी, असं सरपंच म्हणालेत.

हेही वाचाः कोकणी कवी अशोक शिलकर यांची आत्महत्या

सरकारने लक्ष घालण्याची गरज

सत्तरी तालुक्यातील केरी पंचायत क्षेत्राजवळ महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग तालुक्यातला विर्डी गाव येतो. या गावातून केरी गावात सहज प्रवेश करता येतो. या मार्गावर पोलिसांची गस्त नाही आहे. यापूर्वी या मार्गावर नाकाबंदी करण्यात यावी अशी मागणी सरकारच्या संबंधित विभागाकडे मी केली होती. मात्र त्याकडे कानाडोळा करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातून या मार्गाचा उपयोग करून अनेक लोक बिनधास्तपणे गोव्यात प्रवेश करत आहेत. यामुळे केरी भागात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असं सरपंच  सय्यद म्हणाले.

हेही वाचाः BREAKING | बारावीची परीक्षा अखेर रद्द

महाराष्ट्रातील नागरिकांकडून सरकारलाच आव्हान

केरी तपासणी नाक्यावर खास अधिकार्‍यांची नियुक्ती करून बेळगावमार्गे गोव्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची तपासणी करण्यात येतेय. त्याचप्रमाणे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र नसल्यास राज्यात प्रवेश करण्यावर सक्त मनाई करण्यात आलीये. मात्र दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रातील नागरिक बिनधास्तपणे गोव्यात प्रवेश करून सरकारलाच आव्हान देण्याचा प्रयत्न करतायत, असं सरपंचाचं म्हणणं आहे.

हेही वाचाः सभापतींकडून साळ ग्रामपंचायतीत ‘सॅनिटायझर स्प्रे पंप’चं वितरण

केरी गावात संचारबंदीचे तीनतेरा

त्याचप्रमाणे केरी भागात संचारबंदीच्या नियमाचे तीनतेरा केलेत. केरी भागातील दुकानदारांना मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी कडकपणे करण्यासंदर्भात  नोटिसा जारी केल्या आहेत. मात्र काही दुकानदारांना काहीच पडलेलं नाही. अशा लोकांवर पोलिसांनी कडक कारवाई करणं गरजेचं आहे, असं सरपंच सय्यद म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!