मुख्यमंत्र्यांचा जनसंवाद तर भाजप प्रदेशाध्यक्षांचा संघटना संवाद दौरा

कॉंग्रेस निवडणूक प्रभारींना अनुल्लेखाची चपराक

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कॉंग्रेसने विधानसभा निवडणूक रणनिती ठरवण्यासाठी पी. चिदंबरम यांच्यासारख्या बड्या नेत्याची नियुक्ती केली खरी पण त्याची साधी दखलही राज्यातील सत्ताधारी भाजपने घेतली नाही. त्यांचे नाव न घेता इतर पक्ष काय करतात ते पाहण्यास वेळ तरी कुठे आहे, अशी विचारणा करत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पी. चिदंबरम यांना अनुल्लेखाची चपराक दिलीय.

राज्यातील विधानसभा प्रभारी, अध्यक्ष व सचिवांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना तानावडे यांनी भाजपच्या राष्ट्रीय पातळीवर नेत्यांच्या राज्य दौऱ्याकडे पत्रकारांचे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले, जनतेपर्यंत जाणे ही भाजपची रणनिती आहे. पक्ष संघटनेचे इतके उपक्रम आहेत की माध्यमांशी संवाद साधण्यासाठी वेळ मिळत नाही. तरीही येत्या १५ दिवसात केल्या जाणाऱ्या दौऱ्यात माध्यम संवादासाठी वेळ दिला जाणार आहे.

भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला गती देताना १५ ऑगस्टपूर्वी राज्यातील २४ मतदारसंघांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे दौरा करतील असे नियोजन केले आहे. येथील इन्सिस्ट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात झालेल्या मतदारसंघ प्रभारी, मंडळ अध्यक्ष व मंडळ सचिवांच्या बैठकीत या दौऱ्याची निश्चिती करण्यात आली आहे. उद्यापासून (ता.१०) या दौऱ्यास सुरवात केली जाणार आहे.

तानावडे यांनी पत्रकार परिषदेत या दौऱ्याचा तपशील जाहीर केला. त्यानी सांगितले, प्रदेशाध्यक्षांचा दौरा हा संघटनात्मक पातळीवरील संवादासाठी तर मुख्यमंत्र्यांचा दौरा हा कार्यकर्ते व जनता यांच्यासोबतच्या संवादासाठी आहे. येत्या ३१ ऑक्टोबरपूर्वी सर्व मतदारसंघातील विधानसभा निवडणूक तयारी पूर्ण करण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे त्यामुळे गणेश चतुर्थीनंतर उर्वरीत १६ मतदारसंघांचा दौरा केला जाणार आहे.

त्यांनी सांगितले, प्रदेशाध्यक्ष पहिल्या टप्प्यात साखळी, केपे, हळदोणे, कुंकळ्ळी, थिवी, कुडचडे, दाबोळी, पेडणे, मुरगाव, सांताक्रुझ, वास्को व कुंभारजुवे मतदारसंघाचा दौरा करतील. मुख्यमंत्री साळगाव, सावर्डे, सांगे, मांद्रे, मये, डिचोली, थिवी, फातोर्डा, शिरोडा मतदारंसघाचा दौरा करणार आहेत. दौरा लांबला तर त्याच मतदारसंघात रात्रीचा मुक्कामही कार्यकर्त्याच्या घरी केला जाणार आहे. राज्य प्रभारी सी. टी. रवी १७ व १८ ऑगस्ट रोजी राज्यात येऊन एकंदरीत निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत.

कॉंग्रेसने निवडणूक रणनिती ठरवण्यासाठी पी. चिदंबरमसारख्या ज्येष्ठ नेत्याकडे गोव्याची जबाबदारी सोपवल्याबाबत प्रतिक्रीया व्यक्त करण्यास नकार देऊन ते म्हणाले, आम्ही आमचे काम पुढे नेत आहोत. कोण काय करतो हे बघण्यासही वेळ नाही. आम्ही पुढे कसे जायचे याचाच विचार करतो. आम्ही रणनिती ही सकारात्मक दृष्टीकोन घेऊन जनतेपर्यंत जाण्याची आहे. त्यामुळे भाजपचे नेते, कार्यकर्ते निवडणूक असो वा नसो लोकांपर्यंत जात असतात. आम्ही तूर्त स्वबळावर, जनतेच्या विश्वासावर, लोकांच्या सहकार्याने निवडणूक जिंकणार आहोत यावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. राजकारणात विविध टप्प्यावर विविध निर्णय घेतले जातात पण सध्या तशी काही चर्चा नाही.
आरोग्य स्वयंसेवकाचे मंडळ पातळीवरील प्रशिक्षण १५ ऑगस्टला सुरु होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक, ॲड नरेंद्र सावईकर होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!