देशाचा खरा इतिहास समजावून सांगण्याची गरज – मुख्यमंत्री

पणजीत मुख्यमंत्री, तर मडगावात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा शुभारंभ

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः ३० मार्च १९३० या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी साबरमती आश्रमात दांडी यात्रा सुरू केली. या दिवसाचे औचित्य साधून देशाच्या कानाकोपऱ्यात शुक्रवारी ‘आझादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यानिमित्त पणजी तसंच मडगावात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

देशाचा तिरंगा सर्व जनतेला एकत्र आणतो

नव्या पिढीमध्ये देशप्रेमाची भावना रुजविण्यासाठी त्यांना देशाचा खरा इतिहास समजावून सांगण्याची गरज आहे. आमचा देश विविधतेने नटला आहे. देशाचा तिरंगा सर्व जनतेला एकत्रित आणतो, असं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितलं. येथील आझाद भवन मैदानावर सायंकाळी झालेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमात ते बोलत होते. आझाद मैदानावरील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्रद्धांजली वाहिली.

स्वातंत्र्यसैनिकांवर कधीही अन्याय होऊ देणार नाही

स्वातंत्र्यसैनिकांना त्यांचा सन्मान मिळणं गरजेचं आहे. त्यांच्या कुटुंबीयांचे नोकरीचे तसंच इतर काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व सरकार कार्यरत आहे. स्वातंत्र्यसैनिकांना त्यांचा अधिकार देण्याचं सरकारकडून राहिलं असेल तर ते दिले जातील. त्यांच्यावर कधीही अन्याय होऊ देणार नाही. राज्य सरकार प्राधान्याने याकडे लक्ष देईल, असं उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी सांगितले. मडगाव येथील लोहिया मैदानावर शुक्रवारी सायंकाळी ‘आझादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाची सुरुवात उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

पणजी-मडगावातील कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती

सायंकाळी आझाद मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला मुख्य सचिव कुणाल, नेहरू युवा केंद्राचे कालिदास घाटवळ, माहिती खात्याचे संचालक सुधीर केरकर आदी उपस्थित होते. तर मडगावत लोहिया मैदानावर झालेल्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सुरेंद्र नाईक, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक पंकजकुमार सिंग, स्वातंत्रसैनिक वामन प्रभूगावकर, गोपाळ चितारी, गंगाधर लोलयेकर, वसंत बुधाळकर, कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप उपस्थित होते.

विविधतेत एकता असलेला देश

मुख्यमंत्री डॉ . प्रमोद सावंत म्हणाले, आपल्या देशाला देदीप्यमान इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग यांसह महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला मिळणं आवश्यक आहे. लोकमान्य टिळक यांनी देशात ‘स्वातंत्र्य’ हा शब्द लोकांमध्ये रुजविला. भारत देशात विविधता असली तरी भारत हा एकसंध देश आहे. ३७० कलम रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू – काश्मीर हे देशाच्या मुख्य प्रवाहात आणल्याचं त्यांनी सांगितलं.

विविध कार्यक्रमांचं आयोजन

यावेळी नागेश सरदेसाई आणि डॉ . वर्षा कामत यांनी गोव्याच्या इतिहासाची माहिती दिली . माहिती संचालक सुधीर केरकर यांनी स्वागतपर भाषण केलं. श्याम गावकार यांनी सुत्रनिवेदन केले. यावेळी साखळीच्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केलं. प्रोग्रेस या कार्यक्रमाच्या निमित्ताने आझाद मैदानावर ‘इंडिया ॲट द रेट ७५’ या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. येत्या १५ मार्चपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे. दरम्यान, यावेळी सायकल रॅल काढण्यात आली.

लोहिया मैदानाच्या सुशोभिकरणाकडे लक्ष देणार

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर म्हणाले, लोहिया मैदानाच्या सुशोभिकरणाच्या प्रश्नाकडे वैयक्तिकरीत्या लक्ष देणार. स्वातंत्र्याला ७५ वर्षं पूर्ण होण्याआधी ७५ आठवडे ‘आझादी का अमृत महोत्सव’ हा कार्यक्रम साजरा केला जात आहे. यात प्रत्येक आठवड्याला एक कार्यक्रम अशारितीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षं साजरं केलं जाईल. यात विविध कार्यक्रम साजरे केले जातील. या कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करून करण्यात आलेला आहे. या स्वातंत्र्यसैनिकांचा करू तेवढा सन्मान कमीच असून त्यांचं ऋण कधीही न फेडलं जाणारं असं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!