केमिकल कंपनीला भीषण आग ; 18 कामगारांचा होरपळून मृत्यू !

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला लागलेल्या भीषण आगीत १८ जणांचा मृत्यू झाला असून, काही कामगार बेपत्ता आहेत. तर, १९ कामगारांना वाचवण्यात यश आलं आहे. या कंपनीत केमिकल बनवण्याचे काम सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, नॅशनल डिजास्टर रिलीफ फंडातून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केलीय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय.
आग लागल्याची माहिती समजताच पोलीस व अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळवण्यासीठी प्रयत्न केले. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पाच बंब दाखल झाले होते. याशिवाय रूग्णवाहिका देखील दाखल झाली होती. तर, बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यासाठी कंपनीची संरक्षक भिंत जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली.
या कंपनीत केमिकल तयार केले जात होते, या केमिकलमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. या आगीमुळे परिसरात मोठ्याप्रमाणावर धूर देखील पसरला होता. दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. त्यावेळी कंपनीत ३७ कामगार होते. आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर कामगारांचा शोध घेतला जात आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.