कोरोना लाटेत कामापेक्षा श्रेय लाटण्यावर केंद्राचा ‘डोळा’!

नोबेल पुरस्कार विजेते जगप्रसिद्ध अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांची टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : नोबेल पुरस्कार विजेते जगप्रसिद्ध अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी भारतातील कोविडच्या दुसर्‍या लाटेसाठी केंद्र सरकारवर थेट आरोप केले आहेत. अमर्त्य सेन म्हणाले की, कोविडशी लढाई करण्यापेक्षा भारत सरकारला त्याचं श्रेय घेण्यात अधिक रस होता, त्यामुळे भारतातील कोविडची दुसरी लाट मोठ्या संकटाच्या रूपाने आली. राष्ट्र सेवा दल संस्थेच्या कार्यक्रमात आपल्या भाषणादरम्यान ते म्हणाले की, भारताकडं असलेली रोगप्रतिकारशक्ती आणि प्रभावी औषधं बनविण्याच्या कौशल्यामुळे भारत अधिक चांगल्या स्थितीत होता, परंतु सरकार गोंधळाचे शिकार होते.

प्रोफेसर सेन म्हणाले की, कोविडच्या दुसर्‍या लाटेदरम्यान भारत सरकारची अवस्था स्किझोफ्रेनियाची झाली. स्किझोफ्रेनिया हा मनोविकाराच्या तीव्र स्वरूपाचा संदर्भ आहे ज्यामध्ये ग्रस्त व्यक्ती वास्तविक आणि काल्पनिक जगामध्ये फरक करण्यास अक्षम असते. स्किझोफ्रेनियाग्रस्त अनेकदा कल्पनांच्या सागरात डुबकी मारतात आणि कल्पनांना वास्तविकता मानतात.

प्रा. अमर्त्य सेन म्हणाले की, कोविड दरम्यान भारत सरकारला या स्किझोफ्रेनियाचा त्रास झाला. काम करण्यावर भर देण्याऐवजी त्यांनी कामासाठी वाहवा मिळवण्यावर भर दिला. ज्या क्षमतेनं सरकारनं या रोगाचा सामना करायला हवा होता ती क्षमता केंद्र सरकार दाखवू शकले नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!