मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची केंद्र सरकारच्या खातेप्रमुखांशी चर्चा

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथील सचिवालयात केंद्र सरकारच्या खातेप्रमुखांशी चर्चा केली. खातेप्रमुखांमध्ये कमांडिंग ऑफिसर आयएनएस मांडवी कमोडोर टी. व्ही. एन. प्रसन्ना, गोवा बॉयज बटालियन एनसीसीचे कर्नल एम. के. एस. राठोड, गोवा गर्ल्स बटालियनचे एनसीसी कमांडिंग ऑफिसर कर्नल सुखमन सिंग, गोवा नौदल युनिट एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन डीन मेंडोंका आणि नोडल ऑफीसर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स दोनापावल पणजी प्रा. सुतिष्णा बाबू हे बैठकीस हजर होते.
आयएनएस मांडवीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
विविध प्रसंगांच्या वेळी आणि विशेषतः पूरस्थितीच्या प्रसंगी मदत पोहोचवण्याच्या कार्यात आयएनएस मांडवीकडून पुरविण्यात आलेल्या मदतकार्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. एनसीसी विभागाकडून राबविण्यात येणारा कार्यक्रम गोव्यातील युवकांना फायदेशीर असून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी, साहसी कृतींना सामोरे जाण्याची आणि त्यांना चांगले नागरिक बनविण्याची सामाजिक जबाबदारी वाढेल.
एनसीसी अधिकार्यांनी समन्वय साधावा
राज्यातील प्रशिक्षण पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि एनसीसीमध्ये गोव्यातील स्वयंसेवकांची संख्या वाढविण्यासाठी एनसीसी अधिकार्यांनी क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाचे संचालक, उच्च शिक्षण संचालनालय आणि शिक्षण संचालकांशी समन्वय साधावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. खातेप्रमुखांनी आपली बलस्थाने आणि कार्यक्षेत्रे सांगून विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे गोवा राज्यासाठी योगदान विषद केले.
अनेक कौशल्य विकास, व्यावसायिक अभ्यासक्रम
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्समध्ये अनेक कौशल्य विकास व व्यावसायिक अभ्यासक्रम राबविण्यात येत असल्याचे संस्थेच्या नोडल ऑफिसरांनी सांगितले. पाच दिवसांचा जीवरक्षण वर्ग, तीन महिन्यांचा बोट ऑपरेटर वर्ग, राज्यस्तरीय मार्गदर्शक वर्ग आणि ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये दोन वर्षांचा एमबीए तसेच यूजीसी मार्गदर्शक सूचनांनुसार पीएचडी अभ्यासक्रम याविषयी त्यांनी माहिती दिली.