कोरोनाचे भान ठेऊन चतुर्थी साजरी करा

मुख्यमंत्री डॉ. सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट-तानावडे यांचं आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेश चतुर्थी सण गोमंतकीयांच्या जिव्हाळ्याचा होय. लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण आतुरले आहेत, याची मला जाणीव आहे. मात्र हा सण साजरा करताना राज्यातील कोरोना अद्याप संपलेला नाही, याचे भान ठेऊन तो साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट संपत आली असली तरी जगभरातील तज्ज्ञ तिसर्‍या लाटेचा इशारा देत आहेत. यामुळे मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटाईजरचा वापर या गोष्टी टाळता येणार नाहीत. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने अनेकाविध प्रयत्न केले. इच्छा नसतानाही लॉकडाऊन, कर्फ्यूसारचे मार्ग सरकारने अवलंबले. गोमंंतकीयांनीही सरकारला चांगली साथ दिली. याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील कोरोनाची साथ आटोक्यात आली आहे. दररोज सापडणार्‍या रुग्णांत घट झाली आहे, मात्र ती थांबलेली नाही. तसेच बरे होणार्‍यांचे प्रमाणही वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही हजाराच्या आत आहे. मात्र ती अत्यंत कमी वेगाने खाली जात आहे, याचेही भान ठेवणे आवश्यक आहे, असे डॉ. सावंत म्हणाले.

गोमंतकीय आणि गणेश चतुर्थी यांचे नाते अनोखे आणि अतुट आहे. या सणाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील बाजारांमध्ये पुन्हा मोठी गर्दी होईल. ती होऊ न देता आणि सामाजिक अंतराचे बंधन पाळून लोकांनी चतुर्थी साजरी करावी. विनाकारण किंवा काही काम नसताना शक्यतो घराबाहेर पडू नये. घरात आणि बाहेर सर्वत्र मास्कचा वापर करावा. सरकार आपल्या पातळीवर सर्व गोष्टींवर लक्ष ठेऊन आहेच. पण लोकांनीही आपली सामाजिक जबाबदारी ओळखून ती पार पाडावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

राज्य सरकारने 9 मे रोजीपासून राज्यात पुकारलेला कर्फ्यू हळुहळू शिथिल केला असून सध्या राज्यातील बहुतांश व्यवहार सुरू आहेत. सरकारने पर्यटन पूर्णपणे खुले केलेले नाही. चतुर्थी, दसरा आणि दिवाळीनंतर यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेविषयी विचारविनिमय करून सर्व काही सुरू केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंंद शेट-तानावडे यांनीही गणेश चतुर्थी साजरी करताना कोरोना अद्याप संपलेला नाही, हे लक्षात ठेवावे, असे आवाहन केले आहे. यासाठी लोकांनी कारोनाच्या नियमांचे पालन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!