सत्तरीतील ‘या’ गावच्या घरात बिबट्या शिरला, CCTV कॅमेऱ्यात बिबट्या कैद!

Goan Varta Live | प्रतिनिधी
सत्तरी : सत्तरी तालुक्यातील होंडा पंचायत क्षेत्रातील चिरेव्हाळ गावांमध्ये गेल्या काही दिवसापासून बिबट्याची दहशत वाढल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या चार दिवसांपूर्वी या गावातील मराठे कुटुंबाच्या घरांमध्ये अचानकपणे बिबट्या घुसल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय.
बिबट्या दिसून आल्याप्रकरणाची तक्रार दोन दिवसांपूर्वी वनखात्याच्या यंत्रणेला देऊनही त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नसल्याचा आरोप केला जातो आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरलेली आहे. दरम्यान बिबट्या घरामध्ये घुसून अशाप्रकारे दहशत माजवत असल्याबद्दल नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे. वनखात्यानं या बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरतेय.

वन खात्याला जाग कधी येणार?
दरम्यान गेल्या काही वर्षापासून सत्तरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये रानटी जनावरे लोकवस्तीत घुसण्याचे प्रकार वाढू लागलेत. बिबट्या, रानडुक्कर, गवेरेडे यामुळे नागरिक आणि रानटी जनावरे यांच्यातील संघर्ष वाढताना दिसतोय. यावर सरकारने ताबडतोब लक्ष घालून उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र त्यासंदर्भात अजूनतरी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही. ४ दिवसांपूर्वी होंडा पंचायत क्षेत्रातील चिरेव्हाळ या गावातील मराठे कुटुंबाच्या घरांमध्ये मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास बिबट्या घुसल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात दिसून आलंय.
बिबट्या अचानकपणे घरामध्ये घुसला व नंतर तो घराबाहेर गेला. यामुळे घरातील कुटुंबाला संशय आल्यामुळे दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज तपासल्यानंतर मध्यरात्री हा बिबट्या घरांमध्ये घुसल्याचे उघडकीस आलंय. यामुळे एकच घबराट पसरली आहे.
दरम्यान, बिबट्याची बातमी इतर आजूबाजूच्या भागात पसरताच नागरिकांत भीती निर्माण झाली असून सदर बिबट्याचा बंदोबस्त ताबडतोब करावा अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा दिवसापूर्वी सदर बिबटा अचानकपणे लोकवस्तीमध्ये घुसला होता आणि त्यानं कुत्र्याची शिकार केली होती. तेव्हापासून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशा प्रकारची मागणी केली जातेय.
