दुसर्‍या राज्यातलं जात प्रमाणपत्र असणं हा गुन्हा आहे का?

सांगेतील पूर्णिमा पंचवाडकर यांची कैफियत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : केवळ दुसर्‍या राज्यातलं जात प्रमाणपत्र असल्यामुळे सांगे नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फेटाळण्याचा प्रकार घडलाय. यामुळे आपल्यावर अन्याय झाला असून सरकारने न्याय द्यावा, अशी मागणी पूर्णिमा पंचवाडकर यांनी केलीय.

पंचवाडकर यांनी सांगे नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी उपजिल्हाधिकार्‍यांचं ऑफिस गाठलं. मात्र पंचवाडकर यांचं जात प्रमाणपत्र परराज्यातील असल्यामुळे उमेदवारी अर्ज स्वीकारण्याबाबत त्यांनी असमर्थता दर्शवली. अर्जांच्या छाननीदिवशी यावर शिक्कामोर्तब झालं. अन्य राज्यातील महिला गोव्यातील पुरुषाशी लग्न झाली आणि तिनं सर्व कागदपत्रे गोव्यात आणली, तरी ती स्थलांतरित कशी, असा सवाल पंचवाडकर यांनी केलाय. सांगेच्या उपजिल्हाधिकार्‍यांनी ज्या परिपत्रकाच्या आधारे अर्ज फेटाळला, त्यात कुठेही हा मुद्दा नमूद केलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, तोपर्यंत संघर्ष करत राहणार, असं पूर्णिमा पंचवाडकर यांनी सांगितलं.

अखिल गोमंतक महारगण महासभा आक्रमक

संपूर्ण गोव्यात दलितांची गळचेपी होतेय. सरकारचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या अशा लोकांना पाठिंबा मिळतोय. पूर्णिमा पंचवाडकर यांच्या बाबतीतही हाच प्रकार घडलाय. त्यांचं जात प्रमाणपत्र नाकारताना ते कर्नाटकमधलं असल्याचं कारण दिलं. प्रत्यक्षात अशी कुठलीही कायदेशीर तरतूद नाही. त्यामुळे उपजिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी पणजीत मूक आंदोलन करण्याचा इशारा अखिल गोमंतक महारगण महासभेचे अविनाश जाधव यांनी दिलाय.

उपजिल्हाधिकार्‍यांची कृती निषेधार्ह : अशोक परवार

सांगे उपजिल्हाधिकारी सागर गावडे यांच्या कृतीला आक्षेप घेत अशोक परवार यांनी अर्ज फेटाळल्याबद्दल त्यांचा निषेध केला. अनुसूचित जातीच्या लोकांची जात प्रमाणपत्र कोणत्याही राज्यात स्वीकृत असतात. मात्र सांगे उपजिल्हाधिकार्‍यांनी एससी समाजावर अन्याय केला असून त्यांनी भारतीय राज्यघटनेचा अवमान केलाय. एससी समाजाला मिळालेल्या राखीव वॉर्डमध्ये निवडणूक लढवण्यासाठी पंचवाडकर यांनी अर्ज सादर केला. देशभरात कुठल्याही राज्यात एससी समाजाचं जात प्रमाणपत्र स्वीकारलं जातं. मात्र सांगे उपजिल्हाधिकार्‍यांची ही कृती निषेधार्ह आहे. आम्ही त्यांच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान देणार असून निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी करणार आहोत, असं परवार म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!