कॅसिनो कंपनी म्हणते कर्फ्यू वाढणार ?

मग केली चुकीची दुरूस्ती; पत्र मात्र व्हायरल

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजीः राज्य सरकारने जाहीर केलेला राज्यव्यापी कर्फ्यू 31 मे रोजीपर्यंत लागू आहे. केंद्र सरकारने कोविडसंबंधी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांना 30 जून 2021 पर्यंत मुदतवाढ दिलीए. आता याच अनुषंगाने राज्यातील कर्फ्यू वाढणार की काय, असा सवाल उपस्थित केला जातोय. एकीकडे कर्फ्यू किंवा लॉकडाऊनसंबंधीचे निर्णय हे बडे उद्योजक तथा व्यापारी संस्थांना विश्वासात घेऊनच घेतले जातात. याच अनुषंगाने एका बड्या कॅसिनो कंपनीचे पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झालं असून त्यात राज्यातील लॉकडाऊन (कर्फ्यू हा शब्द पत्रात वापरला नाही) 15 जूनपर्यंत सरकारने वाढविण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलंय. या पत्राची जोरदार चर्चा सुरू होताच शनिवारी 28 रोजी नवे पत्र जारी करण्यात आले. या पत्रात पूर्वीचे पत्र मागे घेत असल्याचं सांगून काही गोंधळामुळे हा प्रकार घडला असा खुलासा करून या चर्चेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आलं.

हेही वाचाः ACCIDENT | ट्रक घुसला गॅरेजमध्ये; केरी सत्तरी भागात अपघातांचा धोका वाढला

कुणाचं पत्र आणि पत्रांत काय ?

गोव्यात कॅसिनो उद्योजक आणि सत्ताधारी यांचं नातं सर्वश्रुत असंच आहे. सत्तेवर कुणीही असला तरी कॅसिनो लॉबीचा मोठा पगडा सरकारवर असतो हे वेळोवेळी दिसून आलंय. अनेक महत्त्वाच्या निर्णयांबाबतही कॅसिनो लॉबीचा प्रभाव दिसून येत असल्याचे अनेक प्रकरणांवरून दिसून आलंय. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सरकारने कॅसिनो उद्योजकांना मोकळे रान ठेवले होते. याचा परिणाम म्हणूनच राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढल्याचा आरोप होतोय. याच अनुषंगाने सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या पत्राला महत्व प्राप्त झालंय. डेल्टा कॉर्प ही राज्यातील एक बडी कॅसिनो कंपनी. या कंपनीचे मालक जयदेव मोदी असून त्यांचा मोठा दबदबा आहे. या कंपनीचे तीन समुद्री तर एक जमिनीवरील कॅसिनो गोव्यात चालतो. या कॅसिनो कंपनीकडून 27 मे 2021 रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया (एनएसईआयएल) तसंच बीएसई लिमिटेड यांना एक पत्र लिहीण्यात आलं. या पत्रात गोवा सरकारने राज्यातील लॉकडाऊन 15 जून 2021 पर्यंत वाढविल्याचा उल्लेख केलाय. या लॉकडाऊनमुळे कॅसिनो उद्योग या काळासाठी बंद राहणार असल्याचे सूचीत केलंय.

सगळीकडे पत्राचीच चर्चा

डेल्टा कॉर्प कंपनीचे हे पत्र सोशल मिडीयावर बरेच व्हायरल झालंय राज्य सरकारने कर्फ्यू वाढविण्यासंबंधी कोणतीही घोषणा केली नसताना कॅसिनो कंपनीला याची आगाऊ माहिती मिळालीच कशी, अशी जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांनी या पत्राचा संदर्भ देत राज्यातील कर्फ्यू 15 जून पर्यंत वाढवल्याच्या वावड्याही सोडल्या. ह्याच पार्श्वभूमीवर जेव्हा या पत्राच्या वैध्यतेबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता शनिवारी 28 रोजी याच कंपनीचं एक नवं पत्र उघडकीस आलं. डेल्टा कॉर्प कंपनीकडून 27 मे रोजीचं पत्र मागे घेण्यात आल्याची माहिती या नव्या पत्रातून देण्यात आली. काही गोंधळामुळेच ही चुकीची माहिती देण्यात आल्याचा खुलासाही कंपनीकडून करण्यात आला.

हेही वाचाः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यात आयुष-64 चा शुभारंभ

लागेबांधे उघड

डेल्टा कॉर्पच्या या पत्रामुळे कॅसिनो कंपन्या आणि सरकारचे लागेबांधेच उघड झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. डेल्टा कॉर्पच्या पहिल्या पत्रामुळे सरकारचा भांडाफोड झाल्यानेच सरकारने दडपण आणून हे पत्र मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप विरोधी काँग्रेसने केलाय. सरकारने कंपनीवर दबाव आणून हे पत्र मागे घेण्यास लावल्याचेही बोलले जाते. आता 15 जूनपर्यंत कर्फ्यू वाढवला तर कॅसिनो कंपनीचा दावा खरा ठरेल आणि त्यामुळे कदाचित पंधरादिवसांच्या अवधीत कमी किंवा तो अवधी वाढवून सरकार आपली कात वाचवण्याचा प्रयत्न करू शकते, अशी शक्यताही विरोधी काँग्रेसने बोलून दाखवलीय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!