रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचा लाभ कोणाला?

वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांची मुख्यमंत्र्यांकडे स्पष्टीकरणाची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्को : रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचा लाभ कोणाला होणार आहे, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी केली आहे. रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला माझा विरोध नाही. मात्र त्यापूर्वी त्याचा लाभ कसा व कोणाला होईल, हे समाजाला कळले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

रेल्वेमार्ग दुपदरीकरण झाल्यानंतर गोव्यात किती ट्रेन धावतील, त्यांचा लाभ कोणास होणार आहे याची माहिती देण्याची विनंती करणारे पत्र आपण मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. त्यासंबंधी त्यांनी स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. पूर्वी मीटरगेज होते. त्यानंतर ब्रॉडगेज रेल्वेमार्ग करण्यात आला. दुपदरीकरणानंतर त्रिपदरीकरण, चौपदरीकरण रेल्वेमार्ग होतील मग काय करावे, असा सवाल आमदार आल्मेदा यांनी उपस्थित केला. गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनाही आपण हे प्रश्न विचारले होते.

वास्कोत रेल्वेमार्ग दुपदरीकरण करण्यापूर्वी काही प्रश्नांची उत्तरे वास्कोवासीयांना मिळाली पाहिजेत.

दक्षिण पश्चिम रेल्वेच्या सरव्यवस्थापकांनी आपल्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला होता. त्यांनी दुपदरीकरणाला हरकत आहे काय, असे विचारले होते. दुपदरीकरणाचा लाभ कोणाला व कसा होणार आहे याची माहिती देण्याची मागणी आपण त्यांच्याकडे केली आहे.
– कार्लुस आल्मेदा, आमदार, वास्को

आरोप नको, पुरावे द्या : दिगंबर कामत

मडगाव : मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणीत काँग्रेसच्या काळात वाढ झाली व दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्री असताना परवानगी दिल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आरोपानंतर विरोधी पक्षनेते कामत यांनी केवळ आरोप नको तर पुरावे द्या, असे प्रतिआव्हान दिले आहे. मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी वाढीसाठी परवानगी दिल्याच्या आरोपाचे खंडनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेसच्या कार्यकाळातच कोळसा हाताळणीत वाढ झाली व दिगंबर कामत हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणीत वाढ करण्यासाठी परवानगी दिली होती, असे आरोप केले होते. त्याबाबत कामत म्हणाले की, कोळसा हाताळणीत वाढ करण्यासाठी मुख्यमंत्रिपदी असतानाच्या कार्यकाळात परवानगी दिलेली नाही. परवानगी दिल्याचे आरोप करणार्‍यांनी माझी सही असलेले परवानगीची कागदपत्रे सादर करावीत. लोकांची दिशाभूल करण्यासाठी खोटे आरोप करू नयेत. या आरोपांवर याआधीही पुरावे सादरीकरणाचे आव्हान दिले आहे.

काँग्रेस आमदार प्रतापसिंग राणे यांनीही कोळसा हाताळणीत वाढ करण्यात काँग्रेसचा हात असल्याचे आरोप करण्यापेक्षा सत्ताधार्‍यांनी ते आदेश रद्द करून कोळसा हाताळणी बंद करावी, असे म्हटले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!