बेफिकीर, विनामास्क मुंबईकरांकडून तब्बल 58 कोटींची दंडवसुली !

मुंबई पोलिस-रेल्वे पोलिसांचा कारवाईचा धडाका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या लसीकरण आणि मास्क या दोन गोष्टी महत्वाच्या असल्याचं सांगत आवाहन आणि जनजागृती केली जात आहे. मात्र अद्यापही अनेकांकडून सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर टाळला जात आहे. अशा बेफिकीर नागरिकांवर मुंबई महानगरपालिकेने कारवाई करत तब्बल ५८ कोटींचा दंड वसूल केला आहे. २३ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार, मुंबई पोलीस तसंच रेल्वेकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एकूण ५८ कोटी ४२ लाख ९९ हजार ६०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई करत मुंबई पोलिसांनी ७ कोटी ६२ लाख ७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर रेल्वेने एकूण ५० लाख ३९ हजार २०० इतका दंड वसूल केला आहे. यामध्ये पश्चिम रेल्वे (२२ लाख ६३ हजार ४००), हार्बर रेल्वे (६ लाख ५७ हजार ६००) आणि मध्य रेल्वे (२१ लाख १८ हजार २००) अशा तिन्ही मार्गांचा समावेश आहे.

दरम्यान, मुंबईत गुरुवारी ७८९ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर १० रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी ३५ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. बाधितांचे प्रमाण मात्र २.२१ टक्के इतकेच होते. गुरुवारी ७८९ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या सात लाख २४ हजारांपुढे गेली आहे. एका दिवसात ५४२ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत सहा लाख ९१ हजारांहून अधिक म्हणजेच ९५ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या १४ हजार ८१० झाली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!