मतदारांना फसवणाऱ्या राजकीय पक्षांचे चिन्ह रद्द करा

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस सुनील कवठणकर यांची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस सुनील कवठणकर यांनी मंगळवारी टीएमसी पक्ष मतदारांना खोटी आश्वासने देत असल्याने त्यांचे निवडणूक चिन्ह रद्द करण्याची मागणी केली. राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने टीएमसीने जाहीर केलेल्या योजना अंमलात आणणे कठीण आहे असे ते म्हणाले. टीएमसी गोव्यातील जनतेची फसवणूक करत आहे असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचाः ‘या’ भाजप उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल

अशा योजना चालीस लावणे कठीण

सार्वजनिक निधीचा वापर करून मोफत योजना देण्याचे आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षांच्या सततच्या कृत्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि भारतीय निवडणूक आयोगाकडून प्रतिक्रिया मागितल्या असल्याने त्यांचा संदर्भ देत कवठणकर म्हणाले की, राज्याची तिजोरी रिकामी झाली आहे आणि त्यामुळे अशा योजना चालीस लावणे कठीण आहे.

कवठणकर यांनी मंगळवारी पणजीत पत्रकार परिषद घेऊन मतदारांना खोटी आश्वासने देण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी पणजीचे उमेदवार एल्विस गोम्स, जीपीसीसी संशोधन विभागो अध्यक्ष अविनाश तावारीस, आणि पणजी मतदारसंघाच्या निरिक्षक सुनिथा हुरकडली उपस्थित होत्या.

टीएमसीच्या योजना सरकारी तिजोरीला न परवडणाऱ्या

टीएमसीने युवकांना २० लाख रुपये कर्ज देण्याचे, महिलांना आर्थिक मदत आणि बेरोजगारी भत्ता देण्याचे आश्वासन दिले आहे. या योजनांसाठी १ लाख कोटींहून अधिक निधी लागणार आहे. टीएमसी हा निधी कुठून आणणार आहे, असा प्रश्न कवठणकरांनी उपस्थित केला. टीएमसीने अशा गोष्टींचे आश्वासन दिले आहे जे सरकारी तिजोरीला परवडणारे नाही. सध्या ते स्वर्ग, तारे आणि चंद्र खाली आणण्यासाठीही तयार आहेत. पण ते शक्य आहे का, असा सवालही कवठणकरांनी उपस्थित केला.

हेही वाचाःसंकल्प आमोणकरांनी भरला उमेदवारी अर्ज

टीएमसीने पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांनाही फसवले

त्यांनी केवळ गोव्यातील लोकांनाच फसवले नाही, तर त्यांच्या पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांनाही फसवले आहे. युवा क्रेडिट कार्डच्या अंमलबजावणीसाठी १ लाख कोटी लागतील. ही रक्कम कुठून आणणार. आपल्या राज्याकडे असे महसूल संकलन आणि निर्मिती आहे का. असा प्रश्न कवठणकरांनी केला. टीएमसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशा योजना जाहीर करून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला. टीएमसी मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहे. टीएमसी आणि इतर राजकीय पक्ष जे खोटी आश्वासने देत आहेत त्यांचे राजकीय चिन्ह रद्द केले पाहिजे, अशी मागणी कवठणकरांनी केली.

प्रत्येक गोष्टीला आधार असायला हवा

पणजीचे उमेदवार एल्विस गोम्स म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांनी दिलेल्या या मोफत सुविधांची गंभीर दखल घेतली आहे हे चांगले आहे. प्रत्येक गोष्टीला आधार असायला हवा. आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती सर्वात वाईट आहे. अशा योजना येथे चालणारच नाहीत, असं ते म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!