आणखी एक घोटाळा! मेटा स्ट्रीपने कॅनरा बँकेला 90 कोटींना फसवले

कंपनी, बँकेच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पणजीतीलयेथील कॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांशी साटेलोटे करून ९० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) गोवा विभागाने ‘मेटा कॉपर आलोय लिमिटेड’ (मेटा स्ट्रीप लिमिटेड) कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुशील खेतान यांच्यासह इतर संचालकांवर तसेच बँकेच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी बँकेने कंपनीला वेळोवेळी पत सुविधेद्वारे १०७.२० कोटी रुपये मंजूर केले होते. कंपनीने एकरकमी परतफेड योजनेद्वारे (ओटीएस) केवळ १७.२० कोटी रुपये भरून बँकेची ९० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे, असे तक्रारीत नोंद केले आहे.

या प्रकरणी सीबीआयचे गोवा विभागाचे प्रमुख तथा अतिरिक्त अधीक्षक सी. बी. रामादेवन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिषेक कुमार यांनी मेटा कॉपर आलोय लिमिटेड (मेटा स्ट्रीप लिमिटेड) कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुशील खेतान, संचालक आशा खेतान, दीपक माथूर यांच्यासह बँकेच्या अज्ञात अधिकारी तसेच इतर खासगी व्यक्तींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० व १२० बी आर/डब्ल्यू आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम १३(२)व आर/डब्ल्यू १३(१)(डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

कंपनीने गोवा औद्योगिक विकास महामंडळाकडे (जीआयडीसी) ३ ऑक्टोबर १९९७ रोजी सांखवाळ येथे कंपनी सुरू करण्यासाठी करारपूर्व सोपस्कार केले होते. यासाठी कंपनीने आयडीसीकडून २४ डिसेंबर १९९८ रोजी कंत्राट करून २,४१,९६५ चौरसमीटर जमीन ३० वर्षांसाठी भाडेपट्टीवर घेतली. त्यासाठी कंपनीने आयडीसीला १ कोटी ४७ लाख १३ हजार ४३० रुपये पहिला हप्ता आणि प्रत्येक वर्षासाठी ७३,५६७ रुपये भाडे देण्याची हमी दिली. त्यानंतर कॅनरा बँकेच्या व्यवस्थापनाने कंपनीला १७ ऑक्टोबर २००० रोजी २.५० कोटी रुपये रोख पतपुरवठा मंजूर केला.

त्यानंतर बँकेच्या व्यवस्थापनाने कंपनीला ३ नोव्हेंबर २००० रोजी आणखी ४८.६५ कोटी रुपये रोख पतपुरवठा मंजूर केला. यासाठी बँकेने कंपनीकडून हमी म्हणून कच्चा माल, तयार माल व इतर मिळून २७.०९ कोटी रुपयांची तसेच कंपनीचे सुशील व आशा खेतान या संचालकांची वैयक्तिक हमी घेतली होती. त्यानंतर मार्च २००८ मध्ये कंपनीने बँकेच्या अज्ञात अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पतपुरवठा वाढवण्याची योजना सादर केली. याची दखल घेऊन बँकेच्या व्यवस्थापनाने २५ एप्रिल २००८ रोजी कंपनीला १३०.८८ कोटी रुपये रोख पतपुरवठा वाढवून दिला.

खाते एनपीए झाल्यानंतरही पतपुरवठा

२००८ ते २०१० या कालावधीत बँकेच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या कारभारावर नीट लक्ष ठेवले नाही. त्यामुळे संबंधित कंपनीचे खाते एनपीए झाले. असे असतानाही याच कालावधीत बँकेच्या अज्ञात अधिकाऱ्यांनी कंपनीला १२१.८३ कोटी रुपये रोख पतपुरवठा मंजूर केला. कंपनीने सर्व रक्कम दिलेल्या कंपनीच्या व्यवहारासाठी न वापरता नवीन सात कंपन्यांत हा पैसा गुंतवल्याचे उघड झाले आहे.

२०१७ मध्ये मेटा स्ट्रीप लिमिटेड कंपनीने कॅनरा बँकेच्या अज्ञात अधिकाऱ्यांशी साटेलोटे करून कारस्थान रचून एकरकमी योजना (ओटीएस) योजनेचा प्रस्ताव सादर केला. त्यानंतर कंपनीने थकबाकी असलेल्या १०७.२० कोटी रुपयांपैकी फक्त १७.२० कोटी रुपये बँकेला परत केले. त्यामुळे कंपनीने बँकेची ९० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले.

हेही वाचा –

यासाठी शेतकरी करतात मगरीची पूजा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!