कुणी वाट देतो का वाट?

मधलामाज-मांद्रे येथील रॉकी डिकुन्हा यांच्या घरापर्यंत वाट नाही

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे : मधलामाज-मांद्रे येथील रॉकी डिकुन्हा यांच्या जुन्या घरापर्यंत जाण्यासाठी आजपर्यंत साधी पायवाटसुद्धा तयार झालेली नसल्यामुळे या कुटुंबांला नाहक त्रास होत आहे. पावसाच्या दिवसांत दरवर्षी ढोपरभर पाण्यामधून विद्यार्थी आणि महिलांनाही घरातून नियोजित स्थळी जावे लागते. मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असल्याने आणि परिसरात डासांचा फैलाव झाल्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. सरकारने याची गंभीर दखल घेऊन त्वरित कायमस्वरूपी पाय वाट किंवा तीन मीटर रुंदीचा रस्ता करून द्यावा, अशी मागणी क्रिश फर्नांडिस यांनी केली आहे.

हेही वाचा:उपनगराध्यक्षांना हटवण्याच्या हालचाली, वाचा सविस्तर…

पाण्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका संभवतो

मांद्रे मतदारसंघातील मधलामाज येथे रॉकी डिकुन्हा यांचे जुने घर असून त्यांच्या घराकडे जाताना पावसाळ्यात कोणतीच पायवाट नसल्याने घरासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचून तलाव निर्माण होतो. डिकुन्हा कुटुंबियांना ढोपरभर पाण्यामधून पायवाट काढत दैनंदिन कामासाठी जावे लागते. काही वेळा या पाण्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका संभवतो. आठ दिवसांपूर्वी या कुटुंबातील सदस्यांचा एका सापाने चावा घेतल्याची माहिती क्रिश फर्नांडिस यांनी दिली.

हेही वाचा:पक्ष मजबूत करण्यासाठी आप नेत्यांची बैठक…

जास्त पाणी साचल्यामुळे घराबाहेरही पडता येत नाही

दरम्यान, या परिसरात पूर्वी पावसाळ्याचे पाणी जाण्यासाठी एक वाट होती. मात्र, त्या वाटेवरच कोणीतरी बांधकाम करून पाण्याची वाट अडवल्याने डिकुन्हा यांच्या घर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून आरोग्याची समस्या निर्माण होत आहे. पावसाळ्यात जास्त पाणी साचल्यामुळे कुटुंबियांना घराबाहेरही पडता येत नाही. या मतदारसंघातून आतापर्यंत कित्येक आमदार निवडून आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध मंत्रिपदे भूषविली. मात्र, आजपर्यंत डिकुन्हा यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी साधी पायवाट किंवा तीन मीटर रुंदीचा रस्ता करण्यासही या लोकप्रतिनिधींना यश आले नसल्याची खंत रॉकी डिकुन्हा यांनी व्यक्त केली.

हेही वाचा:सत्तरीतील सरपंच, पंच धास्तावले, ‘हे’ आहे कारण…

उमेदवाराकडून पक्की पायवाट आणि रस्ता करून देण्याचे आश्वासन

निवडणुकीच्या वेळी उमेदवार न चुकता आमच्या घरी येतात आणि मतांची मागणी करतात. त्यावेळी उमेदवार येथे पक्की पायवाट आणि रस्ता करून देण्याचे आश्वासन देतात. परंतु, निवडून आल्यानंतर एकदाही आमच्या ढुंकून पाहात नाही. आम्ही जगायचे कसे. एखाद्या आजारी माणसाला इस्पितळात न्यायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे, असं मधलामाज मांद्रे येथील रॉकी डिकुन्हा म्हणाले.

हेही वाचा:शिवसेना बंडखोरांची मने वळविण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या दोघांना अटक…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!