मोदींच्या क्रोनी क्लबच्या घशात घालण्यासाठी कळंगुटला शहरी दर्जा

काँग्रेसचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांचा आरोप

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोव्यातील भ्रष्ट भाजप सरकार या सुंदर भूमीला पंतप्रधान मोदींच्या क्रोनी क्लबला विकण्यासाठी विविध डाव आखत आहे. कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी कळंगुटला शहरी दर्जा देण्याची केलेली घोषणा म्हणजे त्या दृष्टीने उचललेले पाऊल आहे, असा गंभीर आरोप माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते आर्किटेक्ट तुलीयो डिसोझा हजर होते.

हेही वाचाः महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया सुरू

भाजपचं हे षडयंत्र

कळंगुटला शहरी दर्जा जाहिर करण्यापूर्वी सरकारने कळंगुटवासीयांना विश्वासात घेतलेलं नाही. आमच्या सुंदर गावाची अस्मिता नष्ट करणारा शहरी दर्जा स्थानिकांना मान्य नसल्याचं आग्नेलो फर्नांडिस यांनी सांगितलं. सरकारने अधिसूचीत केल्याप्रमाणे शहरी दर्जा मिळाल्यानंतर किनारी व्यवस्थापन आराखड्याखाली सध्या अस्तित्वात असलेली 200 मीटर बांधकामाची अट शिथील होऊन 50 मीटर होणार आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर भल्या मोठ्या इमारती उभ्या राहतील. मोदींच्या क्रोनी क्लबला हॉटेल्स आणि इतर प्रकल्प उभारण्यास मोकळीक देण्यासाठीच भाजपने हे षडयंत्र रचलं असून, सदर प्रकल्प आल्यानंतर स्थानिक शॅक व्यावसायीक तसंच जल क्रीडा व्यावसायीकांना जगणं मुश्कील होणार आहे, असं फर्नांडिस म्हणाले.

हेही वाचाः टीका उत्सवाच्या श्रेयासाठी काँग्रेस, भाजप कार्यकर्त्यांत बाचाबाची

केवळ कळंगुटला शहरी दर्जा देण्याची गरज भासली?

काँग्रेस पक्षाने केलेल्या प्रखर विरोधानंतर सरकाने 56 गावांना शहरी दर्जा देण्याची 30 जानेवारी 2020 रोजी जारी केलेली अधिसूचना 18 फेब्रुवारी रोजी रद्द केली होती, याची आठवण आर्किटेक्ट तुलीयो डिसोझा यांनी करून दिली. फेब्रुवारी 2020 ते 27 मे 2021च्या दरम्यान असं काय घडलं ज्यामुळे भाजप सरकारला केवळ कळंगुटला शहरी दर्जा देण्याची गरज भासली, असा प्रश्न डिसोझा यांनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरित 27 मे 2021 रोजी कळंगुटला शहरी दर्जा देणारी अधिसूचना रद्द करावी. भाजप सरकारने कारवाई न केल्यास काँग्रेस पक्ष स्थानिक लोकांना बरोबर घेऊन प्रखर आंदोलन करणार असल्याचा इशाराही डिसोझांनी दिला आहे. काँग्रेस पक्ष लोकांचा आवाज बनून गोमंतकाची अस्मिता सांभाळण्यासाठी नेहमीच तत्पर असेल, असंही ते म्हणालेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!