कळंगुट पोलिसांकडून आणखी एक बेटिंग रॅकेट उद्ध्वस्त

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : कळंगुट पोलिसांनी कांदोळीत आणखी एक आयपीएलवर (IPL 2020) बेटिंग घेणाऱ्यांचं रॅकेट उद्ध्वस्त केलंय. या कारवाईत तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून लॅपटॉपसह तीन मोबाईल आणि रोख 8,400 रुपये जप्त केले.
आयपीएल बुकींनी गोव्यात बस्तान मांडले असून कांदोळी येथील एका व्हिलावर छापा मारून आयपीएल बेटिंग घेणाऱ्या रॅकेटचा कळंगुट पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या प्रकरणी राजस्थान तसेच भोपाळमधील मिळून पाच जणांना अटक झाली होती. त्या पाठोपाठ क्राइम ब्रांचने मोरजी येथे कारवाई केली होती. क्राइम ब्रांच पोलिसांनी मोरजी येथे तिघांना अटक करून त्यांच्याकडून एक लॅपटॉप, एलईडी स्क्रीन, मोबाईल फोन व रोख 19 हजार 200 रुपये जप्त केले होते. तिघेही हैदराबाद येथील असून संदीप पटेल, कृष्णकांत व भोजा भोपाल यादव अशी नावे आहेत. मोरजी येथे ‘अदारा प्राईम’ या हॉटेलवर धाड घालून पोलिसांनी ही कारवाई केली.
आणखीही बुकी सक्रिय असण्याची शक्यता
आयपीएल क्रिकेट सामने सुरू होतात, तेव्हा गोव्यात मोठ्या प्रमाणात बेटिंग होते. त्यामुळे बेटिंग घेणारे आणखीही बुकी गोव्यात काही ठिकाणी असावेत, असा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेने तपास चालू आहे.
बेटिंग घेणाऱ्या सराईत टोळीचे सदस्य
मोजीत पकडलेले तिघेजण बेटिंग घेणाऱ्या सराईत टोळीतील असून गेली 4 वर्षे बेटिंग घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. दरवर्षी ते आपली ठिकाणे बदलतात. क्रिकेट मोसम सुरू झाला की ते अशा प्रकारे बेटिंग घेतात आणि मोसम संपल्यावर बेटिंग विजेत्यांचे पैसे चुकते करतात.