इंधनाची दरवाढी करून भाजप सरकारने जनतेचे कंबरडे मोडलं

विरोधी पक्ष नेते दिगंबर कामतांची टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगावः गोव्यात २०१२ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने रु. ६० प्रति लिटर पॅट्रोलचे भाव निर्धारित करण्याचं लोकांना आश्वासन दिलं होतं. सन २०१४ मध्ये ‘अच्छे दिन’ची स्वप्नं दाखवून भाजप सरकारने केंद्रात सत्ता संपादन केली. परंतु केंद्र आणि राज्य सरकारने आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव कमी झालेले असतानाही सातत्याने इंधन दरवाढ करून जनतेचं कंबरडं मोडलं आणि दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला. भाजप सरकार आज कष्टकरी जनतेचा खिसा ओरबाडून लुटमार करत आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते दिगंबर कामतांनी केली.

हेही वाचाः पेडणे तालुक्यातील प्रकल्प खरोखरच पेडणेकरांसाठी?

मोदींच्या अविचारी लॉकडाऊनमुळे जनता आर्थिक संकटात

कोविड महामारीत सर्व व्यवहार ठप्प झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या अविचारी देशव्यापी लॉकडाऊन जनता आर्थिक संकटात सापडलेली असताना, असंवेदनशील भाजप सरकार इंधन दरवाढीने त्यांच्यावर अधिक बोजा टाकत आहे. सरकारने ताबडतोब इंधर दरवाढ मागे घ्यावी आणि लोकांना दिलासा द्यावा, असं कामत म्हणाले. भाजप सरकार कष्टकरी लोकांना आर्थिक सहाय्य देत नाही. मोटर सायकल पायलट, खाजेकार, फुलकार, रेंदेर, पोदेर, मॅकनिक अशा अनेक पारंपरिक व्यावसायिकांना सरकारने संकट काळात वाऱ्यावर सोडलं आहे, असा आरोप कामतांनी केला.

हेही वाचाः बाबा रामदेव पुन्हा ‘पळाले’…थेट लसीकरणाकडं वळले !

काँग्रेसकडून सरकारचा निषेध

विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्या धरणे आंदोलनात भाग घेतला आणि मोदी सरकारचा निषेध केला. दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसतर्फे मोहिद्दीन पॅट्रोल पंप येथे, युवक काँग्रेसतर्फे कुराडे पॅंट्रोल पंपावर तसंच मडगाव गट काँग्रेसतर्फे विर्जीनकप पॅट्रोल पंपावर धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा, दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ज्यो डायस, काँग्रेसचे सचिव नितीन प्रभुदेसाई, दक्षिण गोवा काँग्रेसचे दीपक खरंगटे, अविता नाईक, रोयला फर्नांडिस, युवक काँग्रेसचे राज्य सचिव ॲड. अर्चित नाईक आणि दीपक पै, दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष उबेद खान, मडगाव गट काँग्रेस अध्यक्ष गोपाळ नाईक हजर होते. मडगावच्या उप-नगराध्यक्ष दिपाली सावळ, नगरसेवीका लता पेडणेकर, दामोदर वरक, सिद्धांत गडेकर, सगुण नायक, माजी नगरसेवक अविनाश शिरोडकर, मनोज मसुरकर यांनी ही धरणे आंदोलनात भाग घेतला.

हेही वाचाः देवा तुझा माझा, का रे वैराकार ; याही वर्षी पायी आषाढी वारी नाही !

भाजपने लोकांच्या भावनांची दखल घेणं गरजेचं

भाजप सरकारच्या वाढत्या महागाईमुळे आज प्रत्येकाचं घरगुती जमा-खर्चाचं गणित कोलमडलं आहे. गृहिणींना आज गॅस सिलींडरच्या वाढत्या किमतीने महिन्याचा खर्च सांभाळताना कष्ट सोसावे लागत आहेत. भाजपने लोकांच्या भावनांची दखल घेणं गरजेचं आहे, असं दिपाली सावळ यांनी सांगितलं.

हेही वाचाः खासगी रुग्णालयांवरील अनावश्यक टीका ही निंदनीय

सरकारकडे कसलीच योजना नाही

बेजबाबदार भाजप सरकारने लोकांचं भलं करणं सोडूनच दिलं आहे. अर्थव्यवस्था परत रुळावर आणण्यासाठी सरकारकडे कसलीच योजना नाही, असे काँग्रेसचे सचिव नितीन प्रभुदेसाई म्हणाले.

हेही वाचाः गोवा फॉरवर्डची घरातून सुरुवात!

आजच्या धरणे आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण राज्यातील सर्व चाळीस मतदारसंघात धरणे आंदोलन करून काँग्रेस पक्षाने मोदी सरकारचा निषेध केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!