लोकांना मदत देऊन युवा काँग्रेसने वाहिली राजीव गांधींना श्रद्धांजली

कोविड रूग्ण आणि नातेवाईकांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोवा प्रदेश युवक काँग्रेसने शुक्रवारी देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहताना कोविड रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना पाण्याच्या बाटल्यांचं वाटप करुन मदत केली. हा कार्यक्रम आझिलो हॉस्पिटल, गोवा मेडिकल कॉलेज, दक्षिण जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय-फोंडा आणि मडगाव मधील ईएसआय रुग्णालयात झाला.

युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात घेतला भाग

युवक काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. वरद म्हार्दोळकर, जीपीसीसीचे सरचिटणीस जनार्दन भंडारी, सरचिटणीस डिनिज डिसोझा, युवक काँग्रेसचे सरचिटणीस अर्चित नाईक, उत्तर जिल्हा अध्यक्ष विवेक डीसिल्वा, दक्षिण जिल्हा अध्यक्ष उबेद खान, सरचिटणीस दीपक पै, सरचिटणीस मनोज नाईक, सरचिटणीस नेरिसा फर्नांडिस, साईश आरोसकर, क्लीबन फर्नांडिस, संकेत भंडारी, साई देसाई, रियाज सय्यद, हिमांशू तिवरेकर, रोशन चोडणकर, जाकवान मुल्ला आणि इतरांनी या कार्यक्रमात भाग घेतला.

राजीव गांधींच्या कार्यातून घेतली प्रेरणा

युवक काँग्रेस सदस्यांनी प्रथम राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली, जे भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते, आणि नंतर त्यांनी पाणीवाटपासाठी रुग्णालयांना भेटी दिल्या. आमचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी नेहमीच लोकहितासाठी काम केलं. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आम्हीसुद्धा लोकांच्या मदतीसाठी प्रयत्न केले. राजीव गांधींनी आपल्या महान दूरदृष्टीने भारतात दूरसंचार क्रांती घडवून आणली आणि म्हणूनच आम्ही आपल्या जवळच्या आणि प्रियजनांशी संपर्क साधू शकलो, असं अ‍ॅड. म्हार्दोळकर म्हणाले.

उत्तर – दक्षिण गोव्यातील कोविड रुग्णांना युवक काँग्रेसकडून मदत

दक्षिण गोवा जिल्हा युवक काँग्रेस समितीच्या सदस्यांनी दक्षिण गोव्यात पाण्याच्या बाटल्यांचं वाटप केलं, तर उत्तर गोवा जिल्हा युवक काँग्रेसने उत्तर गोव्यात पाण्याच्या बाटल्या कोविड रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये वितरीत केल्या.

कोविड महामारीच्या सुरुवातीपासून युवक काँग्रेसची लोकांना मदत

कोविड -१९ च्या दुसर्‍या लाटेने गोव्याला लक्ष केल्यापासून युवक काँग्रेसचे सदस्य शासकीय रूग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना आणि लोकांना सतत मदत करत आहेत. त्यांनी सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील प्रत्येक गरजू रूग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!