१९९०मधील गुळेली ग्रामीण आरोग्य केंद्र सुस्थितीत; वाळपईतील नव्या हॉस्पिटलची इमारत धोकादायक

आधीच्या आणि आताच्या आरोग्य क्षेत्रातील प्रकल्पांच्या बांदकामाच्या दर्ज्यात आढळतेय मोठी तफावत

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजीः २००७ ते २०१२ या काळात सत्तरी आणि संपूर्ण गोव्यात हजारो कोटी रुपये खर्चून आरोग्य क्षेत्रातील साधनसुविधा निर्माण केल्या होत्या. वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठाली हॉस्पिटल्स बांधण्यात आली. मात्र हजारो कोटी रुपये खर्चून हल्लीच बांधलेल्या या साधनसुविधांच्या दर्जांबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. याचं कारण म्हणजे काही वर्षांपूर्वी कोट्याधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या वाळपई सामाजिक आरोग्य केंद्राचं सिलिंग कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या इमारतीला अनेक ठिकाणी गळतीही सुरू झालीये. दुसऱ्या बाजूला वर्षभरापूर्वीच लाखो रुपये खर्चून अडवई सत्तरीत सुरू केलेल्या नव्या ग्रामीण आरोग्य केंद्राचीही अशीच परिस्थिती आहे. गेल्यावर्षी या केंद्राचं सिलिंग कोसळलं होतं.

हेही वाचाः गवंडाळीत रेल्वे ओव्हरब्रीज पाहिजेच; लोकांची आग्रही मागणी

१९९०मध्ये बांधलेल्या गुळेली सत्तरीतील ग्रामीण आरोग्य केंद्राची इमारत अजुनही सुस्थितीत

गुळेली ग्रामिण आरोग्य केंद्राची इमारत १९९०मध्ये बांधण्यात आली आहे. या इमारतीला ३० वर्षं पूर्ण झालीत. मात्र ३० वर्षं जुन्या असलेल्या या इमारतीला अजून काहीही झालेलं नाही. ही इमारत अगदी सुस्थितीत आहे. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या हस्ते या इमारतीच्या बांधकामाची पायाभरणी झाली होती. माजी उपमुख्यमंत्री डॉ. विली डिसोझा यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन झालं होतं. तेव्हा अशोक परोब वाळपईचे आमदार होते. ही इमारत अजुनही सुस्थितीत तर आहेच, मात्र ती बांधताना योग्य नियोजन झाल्याचंही दिसून येतं. या इमारतीच्या भोवती भिंत बांधून जमीन सुरक्षित करण्यात आली आहे.

हेही वाचाः काँग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजवणार

सरकारने सगळ्या प्रकल्पांच स्ट्रॅक्चरल ऑडिट करणं गरजेचं

एकाबाजूला १९९०मध्ये बांधण्यात आलेली गुळेली ग्रामीण आरोग्य केंद्राची इमारत सुस्थितीत असताना दुसऱ्या बाजूला हल्लीच काही वर्षांपूर्वी बांधलेलं वाळपई सामाजिक आरोग्य केंद्र आणि अडवई ग्रामीण आरोग्य केंद्राच्या इमारतीचं सिलिंग कोसळत आहे. या इमारतींना गळतीही लागली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर १० ते १२ वर्षांपूर्वी आणि खासकरून २००७ ते २०१२ या काळात बांधण्यात आलेल्या आरोग्य क्षेत्रातील साधनसुविधांचं, मोठमोठ्या इमारतींचं स्ट्रॅक्चरल ऑडिट होणं गरजेचं असल्याचं मत काहींनी व्यक्त केलंय. असं ऑडिट झालं, तर बांधकामांच्या सुमार दर्जाबाबत लोकांसमोर खरी माहिती उघड होईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!