टॉवर्स विस्तारासंदर्भात सरकारकडून ‘बीएसएनएल’ला अद्याप कोणताच प्रस्ताव नाही

‘बीएसएनएल’ स्पष्टीकरण; टॉवर्स उभारणीबाबत सरकार फक्त धोषणा करत असल्याचं उघड

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: ऑनलाइन शिक्षणाला बळकटी देण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी टॉवर्स उभारण्यास परवानगी दिल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. पण, टॉवर्स विस्तारासंदर्भात सरकारने भारत संचार निगम लिमिटेडला (बीएसएनएल) मात्र अद्याप कोणताही प्रस्ताव दिला नसल्याची माहिती समोर आली आहे.

माहिती हक्क कायद्याखाली ‘बीएसएनएल’कडून माहिती

‘गोवन वार्ता’ने माहिती हक्क कायद्याखाली (आरटीआय) मागितलेल्या माहितीत ‘बीएसएनएल’ने यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यात कोविड प्रसार वाढू लागल्यानंतर मार्च २०२० पासून ऑनलाइन शिक्षणास सुरुवात झाली. पण, राज्यातील ग्रामीण भागांत टॉवरच नसल्याने विद्यार्थ्यांना इंटरनेट नेटवर्क मिळणे कठीण बनत आहे. त्याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना अजूनही सहन करावा लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने माहिती-तंत्रज्ञान धोरणाअंतर्गत विविध कंपन्यांना सरकारी जागेत टॉवर्स उभारण्यास मान्यता दिल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला होता. पण, ‘बीएसएनएल’ने मात्र मोबाईल टॉवर्स विस्तारीकरणाबाबत सरकारने अद्याप कोणताही प्रस्ताव आपल्याला सादर केला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्यात ‘बीएसएनएल’चे १,३३,८२३ मोबाईल ग्राहक

राज्यात ‘बीएसएनएल’चे १,३३,८२३ मोबाईल ग्राहक आहेत. तर, केवळ १८ हजार ब्रॉडबँड ग्राहक असल्याची माहिती ‘बीएसएनएल’ने दिली आहे. सरकारी किंवा खासगी जागेत उभ्या केलेल्या टॉवर्ससाठी ‘बीएसएनएल’ सरकारला प्रति महिना किंवा वार्षिक किती भाडे देते, आतापर्यंत किती सरकारी खाती, महामंडळे, कार्यालये, केंद्रीय कार्यालयांनी ‘बीएसएनएल’च्या सेवा वापरूनही पैसे फेडलेले नाहीत, खासगी किंवा सरकारी जमिनीत उभारलेल्या ‘बीएसएनएल’ टॉवर्सवरून वाद सुरू आहे का, या प्रश्नांची उत्तरे देणे ‘बीएसएनएल’ने आरटीआय कायदा २००५ च्या ८(१)(ड) नुसार टाळले आहे.

विद्यार्थ्यांना फटका

दरम्यान, कोविड प्रसारामुळे राज्यातील बहुतांशी शाळा, महाविद्यालये अजूनही बंदच आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनेच शिक्षण दिले जात आहे. राज्यात लवकरच कोविडची तिसरी लाट येईल. त्याचा मोठा फटका १८ वर्षांखालील मुलांना बसू शकतो, असा अंदाजही वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर किमान आणखी एक वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणच घ्यावे लागू शकते. त्यामुळे, सरकारने शहरी आणि ग्रामीण भागांतील इंटरनेटचे जाळे लवकरात लवकर विस्तारण्याची मागणी पालकांकडून होत आहे. पण, सरकारकडून मात्र यासंदर्भात काणाडोळाच करण्यात येत असल्याचे ‘बीएसएनएल’ने दिलेल्या उत्तरांतून दिसून येत आहे.

११७ टॉवर्स उभारले तरी कुठे?

दि. १० ऑगस्ट २०२१ पर्यंत राज्यात ‘बीएसएनएल’चे २४० टॉवर्स आहेत. त्यातील चार टॉवर्स प्रत्यक्षात उभे असले तरीही कार्यान्वित नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. पण, दुसर्‍या उत्तरात खासगी जागेत ४८ आणि सरकारी जागेत ७५ टॉवर्स असल्याचे ‘बीएसएनएल’ने म्हटले आहे. मग उर्वरित ११७ टॉवर्स कोठे उभारण्यात आले आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ‘बीएसएनएल’ टॉवर्सच्या माध्यमातून ४जी सेवा सुरू करणार आहे का, या प्रश्नावर काही टॉवर्सच्या माध्यमातून ४जी सेवा सुरू असल्याचेही ‘बीएसएनएल’ने म्हटले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!