12च्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय! कोरोनाबाधित रुग्णही परीक्षा देऊ शकणार, शिवाय…

शालान्त मंडळाच्या अध्यक्षांची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे राज्यातील सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अशातच शिक्षण मंडळानं बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा एक निर्णय घेतलाय. कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये बारावीची परीक्षा देणे शक्य न झाल्यास जूनमध्ये त्यांना परीक्षेला बसण्याची संधी मिळू शकते. जूनमध्ये दिलेली परीक्षा त्याचा ‘पहिला प्रयत्न’ (अटेम्प्ट) म्हणूनच गणला जाईल, अशी माहिती शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली.

students 800X450

हेही वाचा – Board EXAMS | सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द, तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

स्वतंत्र बैठकव्यवस्था

बारावीची परीक्षा २४ एप्रिल ते ८ मे या काळात होत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर इयत्ता नववी आणि आकरावीची अंतिम परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. बारावी व दहावीची परीक्षा मात्र ठरल्याप्रमाणेच होईल, असे भगीरथ शेट्ये यांनी स्पष्ट केले. बारावी परीक्षेसाठीची विशेष मार्गदर्शक तत्त्वे प्रत्येक केंद्राला पाठवली जातील. केंद्रातील रुग्ण वा कोरोनाबाधित विद्यार्थी यांच्यासाठी स्वतंत्र बैठकव्यवस्था असेल.

हेही वाचा – जीसीईटी परीक्षा १५, १६ जून रोजी

पॉझिटिव्ह रुग्णही देऊ शकतो परीक्षा

कोरोनाबाधित विद्यार्थ्यालाही परीक्षेला बसता येईल; मात्र त्यासाठी आरोग्य खात्याची मान्यता असावी लागेल. तशी मान्यता असल्यास त्याची स्वतंत्र बैठकव्यवस्था केंद्रात केली जाईल. अन्य आजार असलेल्या विद्यार्थ्यांसाठीही स्वतंत्र बैठक व्यवस्था केली जाईल. परीक्षेच्या वेळी मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर, तसेच सामाजिक अंतर पाळणे यांचे काटेकोर पालन परीक्षा केंद्रात करवून घेतले जाईल.

हेही वाचा – दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

जूनचा पर्याय आहेच

आजारी वा कोरोनाबाधित विद्यार्थ्याला एप्रिलमध्ये परीक्षा देणे शक्य न झाल्यास त्याला जूनमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेच्या वेळी परीक्षा देता येते. त्याची ती ‘प्रथम प्रयत्न’ म्हणूनच गणली जाईल. मात्र विद्यार्थ्याने तसे लेखी निवेदन मंडळाला द्यावे लागेल. एखाद्या विद्यार्थ्याने एक वा दोन पेपर दिले आणि नंतर त्याला करोनाची बाधा झाली तर उर्वरित परीक्षा जूनमध्ये देण्याची मुभा त्याला असेल. जूनमध्ये पुरवणी परीक्षेवेळी परीक्षा देण्याची मुभा केवळ गंभीर आजारी वा करोनाबाधित विद्यार्थ्यांसाठीच आहे. त्याचा अन्य कोणी गैरफायदा घेऊ नये, असे आवाहनही भगिरथ शेट्ये यांनी केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!