मोठी बातमी! बारावीसाठी दीड तासाची परीक्षा होण्याची शक्यता

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यात. त्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यावरुन राजकारणही तापत असल्याचं पाहायला मिळतेय. अशातच बारावीच्या परीक्षेबाबत काय निर्णय होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान, बारावीच्या परीक्षांबाबत एक महत्त्वाची अपडेट हाती येतेय.

काय आहेत पर्याय?
दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर आता बारावीची परीक्षा घेण्यासाठी गोवा शालान्त मंडळ तयारीला लागलंय. सीबीएसईने बारावीच्या परीक्षेसाठी दोन पर्याय विचारात घेतल्याचं कळतंय. त्यात काही ठराविक विषयांचे पेपर घेणे किंवा दीड तासाचे पेपर घेणे अशा प्रस्तावांवर विचार सुरू आहे. गोवा शालान्त मंडळही अशाच पर्यायांची चाचपणी सध्या करतंय. यात दीड तासाचा पेपर हाच सध्यातरी सोपा पर्याय असल्याच्या निष्कर्षापर्यंत मंडळ आलं आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वतः या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे बुधवारपर्यंत बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. रविवारीच मुख्यमंत्र्यांनी तसे स्पष्ट संकेतही दिले होते.

हेही वाचा : रविवारी परीक्षांबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले होते? पाहा संपूर्ण व्हिडीओ
दीड तासाचा पेपर?
दरम्यान, दीड तासाचा पेपर घेण्याचं ठरलं तर पुन्हा पेपर सेट करून ते छपाईसाठी पाठवावे लागतील. पूर्वी जाहीर केलेल्या तारखांमुळे पेपर तयार आहेत. पण परीक्षेचा वेळ किंवा पद्धत बदलावी लागली तर पेपर पुन्हा छापावे लागतील. त्यासाठीही मंडळाने तयारी ठेवली आहे, अशी माहिती मिळतेय. दुसरीकडे दहावीची परीक्षा १३ मे ते ४ जूनपर्यंतच्या कालावधीत होणार होती. ती रद्द करून शाळांनी शालान्त मंडळाने तयार केलेल्या वस्तुनिष्ठ निकषांप्रमाणे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करायचे आहे. त्याविषयी मंडळ शाळांना सविस्तर निकष कळवणार आहे.
हेही वाचा : TOP 20 | महत्त्वाच्या २० घडामोडी एका क्लिकवर
अकरावीत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दहावीच्या गणित आणि विज्ञान विषयावर आधारित प्रवेश परीक्षा घेतली जाईल. त्यासाठी एमएसक्यू पद्धतीचा वापर केला जाईल. २२ एप्रिलपासून ठरलेल्या पण नंतर पुढे ढकललेल्या बारावीच्या परीक्षेविषयी याच आठवड्यात निर्णय होईल, असे शालान्त मंडळाने सर्व विद्यालयांना कळवले आहे. त्यामुळे आता बुधवारी याबाबत काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचंय.