BREAKING | मंत्री मायकल लोबो तातडीने दिल्लीला रवाना; कुणाला भेटणार?

गोव्याच्या राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना उधाण

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोव्याच्या विधानसभा निवडणुका 2022 सध्या तोंडावर येऊन ठेपल्यात. त्याच पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकारणात नाट्यमय बदल घडताना दिसताहेत. सोमवारी लुईझिन फालेरो यांनी आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे गोव्याच्या राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आलं असताना अजून एक मोठी बातमी समोर येतेय. कळंगुटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो हे तातडीने दिल्लीला रवाना झाले असल्याचं समजतंय. त्यामुळे ते दिल्लीत जाऊन आता कुणाला भेटतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेय.

लोबो काँग्रेस प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा

मागच्या काही दिवसांपासून भाजप नेते तथा कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण त्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला आहे. लोबो यांनी प्रवेश देऊन कळंगुटमधील काँग्रेसचे तिकीट देऊ नये, अशी मागणी तेथील कार्यकर्त्यांनी पक्षाचे राज्य प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्यासमोर केली.

रिकार्डो डिसोझा यांच्याकडून मायकल लोबोंना आव्हान

कळंगुट मतदारसंघ हा या तालुक्यातील सतत चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात उद्योजक रिकार्डो डिसोझा यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेऊन भाजपच्या तिकीटावरच दावा केला आहे. त्यांनी मंत्री मायकल लोबो यांना आव्हान दिलं आहे.

कळंगुटमध्ये गेली दहा वर्षं मंत्री मायकल लोबोंची सत्ता

कळंगुटमध्ये गेली दहा वर्षं मंत्री मायकल लोबो यांनी आपला जम बसविला आहे. काँग्रेस पक्षाच्या पंच आणि कार्यकर्त्यांना आपल्या बाजूला ओढण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यातच आपल्या सरकार पक्षावरच जाहीर वक्तव्य करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे हा मतदारसंघ आणि लोबो हे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. सध्या त्यांनी साळगांव आणि शिवोली मतदारसंघांकडे आपला मोर्चा वळवला आहे. हे दोन्ही मतदारसंघ भाजप विरोधी पक्षाकडे आहेत. त्यामुळे साळगांवमध्ये पत्नी डिलायला लोबो आणि शिवोलीमध्ये आपल्या समर्थक उमेदवारालाच उमेदवारी मिळावी, असा हट्ट त्यांनी धरला आहे. या त्यांच्या हट्टामुळे साळगांवचे माजी आमदार आणि माजी मंत्री दिलीप परूळेकर आणि शिवोलीचे माजी आमदार व माजी मंत्री दयानंद मांद्रेकर हे नाराज आहेत. परूळेकर हे पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी भाजपच्या उमेदवारीवर रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहेत. तर दयानंद मांद्रेकर यांनी पक्षाची उमेदवारीवर दावा केला आहेत.

रिकार्डो डिसोझा यांनी केली भाजपकडून निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर

या राजकीय घडामोडीत कळंगुटमध्ये रिकार्डो डिसोझा यांनी भाजपकडून निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीर केली आहे. त्यामुळे मंत्री मायकल लोबो हे कोंडीत सापडले आहेत. शिवोली आणि साळगांव मतदारसंघातून त्यांना आता आपल्या कळंगुट मतदारसंघावर लक्ष केंद्रित करावं लागलं आहे. रिकार्डो डिसोझा यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेत उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. कळंगुट मतदारसंघावर २०१२ मध्ये मायकल लोबोमुळे भाजपला आपला झेंडा फडकावता आला होता. सतत दोनवेळा ते निवडून आले असून यावेळी त्यांना हॅट्रिकची संधी आहे. पण या हॅट्रिक मोहिमेवर रिकार्डो डिसोझा यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभं केलं असल्यानं या दोघांपैकी भाजप कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालतो. याकडे बार्देशवासियांसह गोव्यातील इतर जनतेचे लक्ष लागून राहणार आहे.

एकूणच या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर मायकल लोबोंचा अचनाक ठरलेला हा दिल्ली दौरा अनेक प्रश्न उपस्थित करतोय. हा दिल्ली दौरा नक्की काय साध्य करण्यासाठी आखला गेलाय, हे येणारी वेळच सांगेल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!