BREAKING | लुईझिन फालेरो कोलकाता येथे रवाना

दाबोळी विमानतळावर माध्यमांशी बोलणं टाळलं

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः लुईझिन फालेरो यांनी सोमवारी आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते सोमवारीच तृणमूल काँग्रेसमधील प्रवेशाची घोषणा करतील, असं वाटत होतं. पण राजीनामा देऊनही त्यांनी आपण काँग्रेससोबतच असल्याचं स्पष्ट करत तूर्त ‘तृणमूल’चा विषय बाजूलाच ठेवला. पण नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार लुईझिन फालेरो कोलकाता येथे रवाना झाले असल्याचं समजतंय. दाबोळी विमानतळावर जेव्हा माध्यमांनी फालेरो यांना घेरून याविषयी प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलंय. त्यामुळे लुईझिननी खरोखरच काँग्रेसला खिंडार पाडले की भविष्यातील आघाडीचा हा डावपेच आहे, याबाबत गोमंतकीय जनतेत पसरलेला संभ्रम अजून वाढला आहे. लुईझिन फालेरो यांनी अचानक टाकलेल्या या बॉम्बमुळे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासह पुढील खिंड लढवावी लागत आहे.

तरीही मी काँग्रेस कुटुंबासोबतच

तृणमूल काँग्रेसच्या गोवा प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्यापासून सातत्याने लुईझिन फालेरो यांचं नाव चर्चेत होतं. लुईझिन यांनी मात्र आपण ‘आयपॅक’शी चर्चा केली, पण तृणमूलच्या संपर्कात नसल्याचं सांगत या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी सकाळी त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर सभापतींकडे आमदारकीचा राजीनामाही सादर केला. शिवाय पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार असल्यानं ते तृणमूलमधील प्रवेशासंदर्भात घोषणा करतील असा अंदाज सर्वांनी बांधला होता; पण पत्रकार परिषदेतही त्यांनी तृणमूलच्या विषयाला फाटा देत आपण काँग्रेसचा राजीनामा दिला असला, तरीही काँग्रेस कुटुंबासोबतच असल्याचं स्पष्ट केलं.

काँग्रेस पक्ष हे कुटुंब तसंच मोठी चळवळ

काँग्रेस पक्ष हे कुटुंब तसंच मोठी चळवळ आहे. या चळवळीत आपण अनेक वर्षांपासून आहे. पण, काही वर्षांपूर्वी काँग्रेस पक्ष तृणमूल, राष्ट्रवादी आणि वायएसआर असा विभागला आहे. अशा विभागलेल्या काँग्रेसला एकत्र आणून सत्ताधारी भाजपचा राज्यात आणि केंद्रात पराभव करण्यासाठी आपण पुढील काळात झटणार असल्याचे फालेरो यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
काँग्रेसने आपल्या खांद्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. त्या सर्वच जबाबदाऱ्यांना आपण न्याय दिला. मुख्यमंत्री असताना आपण घेतलेले विविध निर्णय राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत आपण काँग्रेसला घवघवीत यश मिळवून दिलं होतं; पण तत्कालीन गोवा प्रभारींनी आपणास सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे जात असताना रोखलं. त्यामुळेच गोव्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होऊ शकलं नाही. त्यानंतर पक्षाने विरोधी पक्षनेते बनण्याचा प्रस्ताव आपल्यासमोर ठेवला होता. पण तो फेटाळला असं म्हणत प्रदेश काँग्रेसला बळकटी देण्यासाठी आपण गेल्या साडेचार वर्षांत काय काय केलं, याची सविस्तर माहितीही फालेरो यांनी दिली.

बुधवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत आपण अद्याप निर्णय घेतलेला नाही. आपला ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला पाठिंबा आहे. पण तृणमूलमध्ये जाण्यासंदर्भात अजून निर्णय घेतलेला नाही, असं लुईझिन फालेरो म्हणाले. फालेरो यांच्यासोबत सोमवारी काँग्रेसचा राजीनामा दिलेल्या यतीश नाईक, विजय पै यांच्यासह फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार आणि इतरांना घेऊन मंगळवारी ते कोलकात्याला जातील आणि बुधवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या माहितीच्या धर्तीवर आज फालेरो गोव्यातील कोलकात्याला जाण्यास रवाना झालेत. आता बुधवारची सकाळी गोव्याच्या राजकारणासाठी कोणती महत्त्वाची वार्ता घेऊन उगवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!