दामोदर मंगलजी कंपनीकडून बेकायदा खनिज मालाची साठवणूक

नावेली कोमुनिदादची पोलिस तक्रार

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : डिचोली तालुक्यातील नावेली कोमुनिदादने दामोदर मंगलजी अँड कंपनी लिमिटेड आणि दामोदर मंगलजी मायनिंग कंपनी यांना लीज करारावर दिलेली जमिन परत घेतलीय. संबंधीत कंपनीकडून या जमिनीचा वापर बेकायदा खनिज साठवणूकीसाठी केल्याची तक्रार कोमुनिदादकडे दाखल झाली होती. या अनुषंगाने कोमुनिदादने लीज करार रद्द करतानाच ही तक्रार खाण घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाकडे पाठवली आहे. तब्बल सुमारे 30 कोटी रूपयांच्या या खनिज मालाचा विषय नावेली परिसरात चर्चेचा विषय ठरलाय.

नावेली कोमुनिदादने एका जाहीर नोटीशीव्दारे संबंधीत कंपनीकडील लीज करार रद्द केल्याची माहिती उघड केली आणि या घोटाळ्याचा पर्दाफाश झालाय. हा करार 19/8/1997 सुरू होता. सुमारे 40 ते 50 हेक्टर कोमुनिदादची जागा या दोन्ही कंपन्यांना देण्यात आली होती. या जागेत कंपनीकडून खनिज साठवणूक केली जात होती. यासंदर्भात गजानन वसंत परब यांनी नावेली कोमुनिदादकडे एक तक्रार दाखल केली. या तक्रारीत वरील दोन्ही कंपन्यांकडून कोमुनिदादच्या जागेचा गैरवापर करून तिथे बेकायदा खनिज साठा ठेवण्यात आल्याचा आरोप केलाय.

या अनुषंगाने गजानन वसंत परब यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि खाण सचिवांना रितसर सर्व कागदोपत्री पुराव्यांसहीत तक्रार नोंद केलीय. दामोदर मंगजली कंपनीच्या सर्व लीजेस विनावापर पडून आहेत. तिथे कोणत्याही प्रकारचे खनिज उत्खनन करण्यात आले नाही. मग हा खनिज साठा नेमका कुठून आणण्यात आला,असा सवाल या तक्रारीत करण्यात आलाय.

विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर खाण खात्याने साठवून ठेवलेल्या खनिजाचे सर्वेक्षण करून हे खनिज जप्त केले होते. या खनिजाची ई-लिलावातून विक्रीही करण्यात आली आणि ही प्रक्रिया सुरू आहे. नावेलीतील कोमुनिदादच्या जमिनीतील खनिजाची नोंद खाण खात्याने केली आहे का आणि केली नसेल तर त्याचे काय कारण,असे अनेक प्रश्न याठिकाणी उपस्थित केले जाताहेत.

वास्तनिक कोमुनिदाद आणि उभय कंपन्यांच्या कराराचा कार्यकाळ संपला होता आणि या कराराचे नुतनीकरण करण्यासाठी कंपनीकडून कोमुनिदादकडे विनंती अर्ज आणि शुल्क देण्यात आले होते. ह्याच दरम्यान, कोमुनिदादकडे तक्रार दाखल झाल्याने कोमुनिदादच्या समितीने 10 डिसेंबर 2020 रोजीच्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत या विषयावर सखोल चर्चा केली. ही बैठक बरीच वादळी ठरली. कोमुनिदादच्या घटकांना संबंधीत कंपनीकडून नोकरीवरून कमी करण्यात आल्याचेही प्रकार या बैठकीत उपस्थित झालेत. येथील शेत जमिनींचे नुकसान, शुल्काची थकबाकी असे अनेक विषय वादाचे मुद्दे ठरले. कोमुनिदादच्या घटकांनाच कंपनीकडून ही वागणूक मिळत असेल आणि कोमुनिदादने घालून दिलेल्या अटींची पूर्तता होत नसेल तर हा करार रद्दबातल ठरवावा, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या जमिनीबाबत कुणीही व्यवहार करू नये

नावेली कोमुनिदादने संबंधीत कंपनीकडील करार रद्दबातल ठरविल्याने कोमुनिदादच्या जागेसंबंधी कुणीही कंपनीकडे आर्थिक व्यवहार करू नयेत,असे आवाहन कोमुनिदादचे अटर्नी विश्वंभर गांवस यांनी केलेय. कुणीही जर या कंपनीकडे किंवा या कंपनीचे संचालक हरिश रजगी यांच्याकडे या जमिनीशी संबंधीत व्यवहार करीत असेल तर ते स्वतः परिणामांना कारणीभूत ठरतील,असेही स्पष्टपणे बजावण्यात आलेय.

30 कोटींच्या खनिज मालाचे काय?

नावेलीत बेकायदा पद्धतीनं साठवणूक केलेल्या सुमारे 30 कोटी रूपयांच्या खनिज मालावर अनेकांची नजर लागून राहीली. या मालाची परस्पर विक्री करून हा माल निर्यात करण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचा सुगावा कोमुनिदादच्या काही घटकांना लागलाय. अलिकडेच भाजपात दाखल झालेल्या एका माजी मंत्र्यांचे सुपुत्र या व्यवहारात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सरकारातील एक मंत्री आणि सदर व्यक्ती हे या एकूणच प्रकरणात गुंतल्याने कोमुनिदादने तत्काळ हे प्रकरण विशेष पोलिस पथकाकडे दाखल करून आपली सुटका करून घेतल्याचीही खबर आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!