BREAKING | 10 वीची बोर्डाची परीक्षा यंदा रद्द; 12 वी परीक्षेसंदर्भात बुधवारपर्यंत निर्णय

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजीः गोवा शालांत मंडळाच्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत एक मोठी बातमी हाती येतेय. राज्यात कोरोना महामारीच्या वाढत्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने 10 वीची बोर्डाची परीक्षा यंदा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. रविवारी संध्याकाळी 5 वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तशी अधिकृत घोषणा केलीये. ही घोषणा त्यांनी सोशल मीडियावर फेसबूक लाईव्ह करत केलीये. विद्यार्थी तसंच पालकांवरील ताण ओळखून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी घोषणा करताना म्हटलंय.
इंटरनल मार्क्स ग्राह्य धरणार
यंदा गोवा शालांत मंडळाची 10वीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यासाठी विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण (इंटरनल मार्क्स) ग्राह्य धरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. विद्यार्थ्यांना मिळालेल्या इंटरनल मार्क्स वरून आता त्यांचा दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तसंच जर एखाद्या विद्यार्थ्याचा कुठला विषय राहिला असेल, तर त्याला एटीकेटी परीक्षेला बसण्याची संधी मिळणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
हेही वाचाः ePathshala: पहिली ते बारावीपर्यंतची NCERT ची सर्व पुस्तके ई-बुक स्वरुपात
12 वी परीक्षांबाबत निर्णय बुधवारी
रविवारी मुख्यमंत्र्यांनी केवळ 10 वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी 12 वीच्या परीक्षांबाबत काहीच सांगितलेलं नाही. 12वीच्या परीक्षांचं काय होणार याबाबत सरकारचा निर्णय अद्याप झालेलं नाही. 12 वीचे विद्यार्थी तसंच त्यांच्या पालकांवरही ताण असल्याची आम्हाला कल्पना आहे. 12वीच्या परीक्षांबाबत शिक्षण तज्ज्ञ समितीशी चर्चा करून बुधवारी अधिकृत घोषणा करणार असल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटलंय.
हेही वाचाः आरोग्य पायाभूत सुविधांची दीर्घकालीन रणनीती अंमलात आणा
शिक्षण तज्ज्ञ समिती, केंद्रीय संरक्षण मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय
10 वी आणि 12 वीच्या परीक्षांसह इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांविषयी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी रविवारी दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. तसंच दहावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ समिती तयार केली होती. त्या समितीशी चर्चा करून तसंच केंद्रीय संरक्षण मंत्र्यांशी केलेल्या चर्चेवर आधारित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी 10 वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय.
हेही वाचाः कोरोनाला झटक्यात बरं करणाऱ्या आयुर्वेदिक औषधाचा ‘या’ राज्यात बोलबाला
डिप्लोमा आणि विज्ञान शाखेत प्रवेशासाठी द्यावी लागणार परीक्षा
डिप्लोमा आणि विज्ञान शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ होणार याची पूर्ण कल्पना गोवा सरकारला आहे. त्यामुळे डिप्लोमा आणि 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश मिळविण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवासची 3 तासांची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा घेण्याचा विचार सरकारचा आहे. ही परीक्षा प्रामुख्याने जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. 15 दिवस अगोदर याविषयी कळविण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणालेत.
हेही वाचाःयुवकाच्या कानशिलात लावणाऱ्या सुरजपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं निलंबन
खासगी, आयटीआय विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्याचा विचार
गोवा शालांत मंडळाची 10वीची परीक्षा खासगी माध्यमातून देणारे विद्यार्थी तसंच आयटीआयचे विद्यार्थी, असे 350 विद्यार्थी राज्यात आहे, ज्यांच्याकडे इंटरनल मार्क्स नाहीत, त्यांच्यासाठी कोरोना परीस्थिती सुधारल्यावर गोवा सरकार 1 किंवा 3 दिवसाची परीक्षा घेण्याच्या विचारात आहे. त्याविषयी निर्णय लवकरच कळविण्यात येणार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
हेही वाचाः बिहारच्या बाप-लेकीची कमाल; कोरोना युद्धात डॉक्टरांच्या मदतीसाठी बनवला रोबोट
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचं स्वागत
गोवा शालांत मंडळाच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या घोषणेचं मी स्वागत करतो. मुख्यमंत्र्यांनी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन बारावीच्या परीक्षेबद्दल योग्य निर्णय लवकरच घ्यावा. सरकारने आगामी शैक्षणिक वर्षासाठी सर्व स्थरांसाठी कृती आराखडा आताच तयार करावा. शैक्षणिक व्यवस्थेसबंधी सर्व निर्णय हे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच सरकारने घ्यावेत हे माझं मत असुन, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे विषय हाताळताना जाणकारांचं मत घेणं महत्त्वाचं असतं. सरकारने आता ऑनलाईन प्रवेश परीक्षा तसंच योग्यता चाचणी परीक्षांसाठी व्यवस्थित नेटवर्क सुविधा उपलब्ध करुन देणं गरजेचं आहे. सदर परीक्षा घेण्यात येणाऱ्या केंद्रांवर अखंडीत नेटवर्क असणार याची खात्री सरकारने करुन घ्यावी. अखंडीत आणि उच्च दर्जाची नेटवर्क सुविधा उपलब्ध असल्यास विद्यार्थ्यानांही परीक्षा देताना लक्ष केंद्रीत करण्यास मदत होते, असं विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी ट्विट करताना म्हटलंय.
Welcome decision of @GovtofGoa to cancel SSC Examination. I urge @goacm to continue consultations with Educationists & take appropriate action on HSSC Exams. It is also important that proper Plan of Action is prepared for next Academic Year after seeking advise of Experts.@INCGoa
— Digambar Kamat (@digambarkamat) May 23, 2021