रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान

गोवा शिवजयंती उत्सव समीतीकडून मडगावात भक्त रक्तदान शिबिर संपन्न

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असं समजलं जातं. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज रक्ताची कमतरता भासू लागलेय. आपली सामाजिक जबाबदारी ओळखून गोवा शिवजयंती उत्सव समीती रक्तदानासाठी पुढे सरसावली. या समितीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं.

गोवा शिवजयंती उत्सव समीतीतर्फे रक्तदान शिबिर

गोवा शिवजयंती उत्सव समीती ही महाराष्ट्रातील तरुणांकडून गोवा राज्यात अनेक सामाजोपयोगी कार्यक्रम राबवते. संघटनेतर्फे आतापर्यंत रक्तदान शिबीर, गरजूंना अन्नधान्य वाटप, कोरोनाकाळात अन्नाच्या पाकिटांचं वाटप, शिवजयंती उत्सव, गोमंतकातील गडकिल्ले संवर्धन, गडकोट मोहिमा आशा अनेक उपक्रमांचं यशस्वी आयोजन केलं गेलं आहे. यातलाच एक उपक्रम म्हणून यंदा शिवजयंतीच्या निमित्ताने सलग चौथ्या वर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं. मडगावातील हॉटेल छत्रपती येथे रविवारी ०७ फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर संपन्न झालं. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं. जवळजवळ २५० पेक्षाही जास्त रक्तदात्यांनी समाज बांधिलकी जपली.

युवावर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

समितीच्या सर्व सदस्यांनी यावेळी उत्तम नियोजन केलं होतं. शासनाच्या नियमांचं पालन करत यावेळी शिबिर संपन्न झालं. गोवा पोलिसांच्या विशेष शाखेचे कर्मचारी अधिकारी यावेळी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. रक्तदान शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करून केली गेली. सकाळपासूनच रक्तदात्यांचा उत्साह दिसून आला. युवावर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपल्या सामाजिक बांधीलकीचा प्रत्यय त्यांनी दिला. गोव्यातील युवकांसोबत महाराष्ट्रातील अनेक युवक यावेळी रक्तदानासाठी पुढे सरसावले. गोवा-महाराष्ट्र ही एकाच आईची दोन लेकरं असल्याची भावना आजही जनमानसात आहे याचा प्रत्यय शिबिराच्या निमित्ताने आला. रक्तदान हे त्यातलंच एक.

गरजेच्या वेळी रक्तपुरवठा पूर्ववत करण्यास हातभार लावलेल्या गोवा शिवजयंती समितीचे तसंच यासाठी झटलेल्या सर्वांचं समाजातील सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!