सावंत-केजरीवाल, काब्राल-चढ्ढा यांच्यात ट्विटर वॉर

कोळसा, रेल्वे दुपदरीकरण, वीज पुरवठ्यावरून आरोप-प्रत्यारोप

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्यातील ट्विटर युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही. दुसरीकडे, दिल्लीतील वीज पुरवठ्याबाबत गोव्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल (Nilesh Cabral) यांनी केलेल्या आरोपांचं खंडन करत आपचे दिल्लीतील नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांनी काब्राल यांना खुल्या चर्चेचं प्रतिआव्हान दिलंय.

‘सेव्ह मोले’ मोहिमेतील कार्यकर्त्यांवर दाखल केलेले एफआयआर आणि कोळसा वाहतुकीवरून गोव्यातील भाजप सरकार निर्माण करत असलेली संभ्रमावस्था यावरून केजरीवाल यांनी ट्विट केलं होतं. त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देताना सावंत यांनी गोवा हे प्रदूषणमुक्त राज्य असल्याचं सांगत दिल्लीतील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला उत्तर देताना केजरीवाल यांनी मोले अभयारण्य हे गोव्याचं फुफ्फुस असल्याचं सांगत गोमंतकीय जनतेच्या सोबत राहण्याचं आवाहन सावंत यांना केलं. केंद्र सरकारचं न ऐकता गोव्याच्या लोकांचा आवाज ऐका, असंही म्हटलं होतं. त्यानंतर गोवा हे कोल हब होउ देणार नाही, आम्ही नेहमीच जनतेसोबत आहोत, असं उत्तर सावंत यांनी दिलं. केजरीवाल हे राज्य आणि केंद्र सरकारमध्ये भांडणं लावण्यात माहीर असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. रेल्वेचं दुपदरीकरण हे राष्ट्रीय विकासाचा एक भाग असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, केजरीवाल यांनी त्यावर उत्तर देताना, माझा सल्ला तुम्ही ऐकण्याची गरज नाही. मात्र गोमंतकीयांचा सल्ला जरूर ऐका. केंद्र सरकारला नकार देण्याची धमक दाखवा, असा सल्ला दिला.

चढ्ढा यांनी स्वीकारलं काब्राल यांचं आव्हान

गोव्यातील वीज पुरवठा आणि दिल्लीतील वीज पुरवठ्यात देण्यात येणारी सवलत या संदर्भात गोव्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी टिप्पणी केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार दिल्लीतील वीज पुरवठ्याबाबत चर्चा व्हायला हवी. हाच धागा पकडून दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष तथा आपचे आमदार राघव चढ्ढा यांनी काब्राल यांचं चर्चेचं आव्हान स्वीकारलंय. दिल्लीतील वीज पुरवठा यंत्रणेवर जाहीर चर्चेसाठी मी 17 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता गोव्यात येतोय. तुम्ही वेळ व स्थळ ठरवा, असं आव्हान चढ्ढा यांनी काब्राल यांना दिलंय.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात वातावरण तापू लागलंय. त्याची झलक आप आणि भाजपमधील वादानं दिसून आलीय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!