भाजप – विकास यांचे अतूट नाते

आधुनिक गोव्याचे शिल्पकार स्व. मनोहर पर्रीकर यांच्या दूरदृष्टीने २०१२ पासून राज्यातील विकासाची घोडदौड आजही कायम

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः भाजप आणि विकास यांचे अतूट नाते आहे. देशासह भाजपशाशित राज्यांनी सर्वांगीण विकास साधला आहे. मागासलेल्या छोट्या राज्यांसह उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र या सारख्या मोठ्या राज्यांचाही समावेश आहे. पर्यटनाचे नंदनवन म्हणून जगभर प्रसिद्ध असलेला आपला गोवाही याला अपवाद नाही. आधुनिक गोव्याचे शिल्पकार स्व. मनोहर पर्रीकर यांच्या दूरदृष्टीने २०१२ पासून राज्यातील विकासाची घोडदौड आजही कायम आहे.

गेल्या दहा वर्षांत राज्य सरकारने तिसरा मांडवी पूलाचे काम पूर्ण

गेल्या दहा वर्षांत राज्य सरकारने तिसरा मांडवी पूलाचे काम पूर्ण केले. झुआरी पुलाचा पाया घातला. तो आता पूर्णत्वास येत आहे. यासह कालवी नदीवरील पूल विक्रमी वेळेत उभारला. तसेच लोटली ते आयडीसी – वेर्णा येथे ४ पदरी महामार्ग साकारला. याचबरोबर साखळी, कांसावली येथे सर्व सुविधांनी युक्त असे आरोग्य केंद्र उभारले. बाळी विद्यालाची सुंदर इमारत उभी केली. अल्तीनो येथे आय टी हब ची निर्मिती केली. पणजीतील कांपाल येथे मांडवी नदी किनारी नागरिकांना फिरण्यासाठी पडपथाची बांधणी केली. इतकेच नव्हे तर पाटो येथे पूल साकारला. तसेच टोंक – कारभाट सरकारी विद्यालय बांधले.

स्व. पर्रीकर यांनी आधुनिक विकासाचा पाया घातला

काँग्रेसच्या भ्रष्टाचारी कारभाराला कंटाळलेल्या गोमंतकीय जनतेने २०१२ मध्ये भाजपला सत्तेत आणले. खाणी आणि पर्यटन यावर अवलंबून असलेल्या गोव्यातील विकासकामांची खरी गरज ओळखून स्व. पर्रीकर यांनी आधुनिक विकासाचा पाया घातला. आवश्यक त्या ठिकाणी पुलांची निर्मिती केली.

काही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर

वाढते पर्यटन आणि वाढत्या रहदारीचा आणि पुढील १०० वर्षांचा विचार करून स्व. पर्रीकर यांनी उत्तर गोव्याला जोडणाऱ्या तिसऱ्या मांडवी पुलाची केवळ पायाभरणीच नव्हे तर अटल सेतू या नावाने भव्य असा पूल साकारला. तसेच उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या झुआरी पुलाचा पाया घातला. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारच्या सहकार्याने सहा पदरी महामार्ग आणि झुआरी पुलाचे काम सुरू केले. स्व. पर्रीकर यांच्या अकाली निधनानंतर साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांच्या खांद्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली. कोरोनाच्या कठीण काळातही राज्य सरकारने सर्व आव्हाने पेलत राज्यात सुरू असलेली विकासकामे बंद होऊ दिली नाहीत. केंद्र सरकारच्या सहकार्याने आर्थिक गणिताची सांगड घालत राज्य सरकारने अनेक विकासकामे पूर्ण केली. यातील काही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. तर काही कामे येत्या काही काळात पूर्ण होतील. मोपा विमानतळ हा भाजपाच्या कार्यकाळातील आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होय. पुढील पर्यटन हंगामापूर्वी मोपा विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होईल.

स्थैर्य आणि विकास हे भाजपचे ध्येय आणि उद्दिष्ट

स्थैर्य आणि विकास हे भाजपचे ध्येय आणि उद्दिष्ट आहे. केंद्रातील भाजपा सरकारच्या सहकार्याने राज्यातील भाजपा सरकारने गेल्या १० वर्षात पर्यटन, शिक्षण, खाण धोरण निश्चित केले. शिक्षण, कला, क्रीडा, सहकार या क्षेत्रासह पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. राज्यातील प्रमुख रस्ते, मैदाने, वीज, पाणी आदी समस्या पूर्णपणे सोडविण्याचे प्रयत्न केले. राज्यातील उदिम व्यापार वाढावा यासाठी अर्थसहाय्य योजना अमलात आणल्या. नव उद्योजकांना प्रोत्साहन दिले. देश विदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य योजना आणली. राज्य सरकारच्या विविध योजनांचा अनेक घटकांनी लाभ घेतला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!