‘आयआयटी व्हावी ही पर्रीकरांची इच्छा’

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : राज्याचे आणि देशाचे पहिले आयआयटीएन मुख्यमंत्री म्हणून स्व.मनोहर पर्रीकर यांची ओळख होती. ते मुंबई आयआयटीत शिकले होते. गोव्यात आयआयटीसारखी प्रतिष्ठीत संस्थेचे वेगळे कॅंपस व्हावे अशी त्यांची प्रबळ इच्छा होती आणि भाजपचे विद्यमान सरकार त्यांची इच्छा पूर्ण करीत आहे,असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केलाय. इथे एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
चर्चा चर होणारच
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शेळ-मेळावलीतील आंदोलकांशी चर्चा करण्यास तयार आहेत. आंदोलक मात्र विरोधकांच्या भूलथापांना आणि अपप्रचाराला बळी पडत आहेत. मुख्यमंत्री शेळ-मेळावलीत जाणार नाही. शेळ-मेळावलीतील आंदोलकांना आपले शिष्टमंडळ पाठवावे लागेल तरच चर्चा होऊ शकते,असेही तानावडे यांनी म्हटले आहे.
आंदोलनाच्या ठिकाणी लोकांची मानसिकता हिंसक बनलेली असते. तिथे मुख्यमंत्र्यांनी जाणे अयोग्य ठरेल. खरोखरच या विषयावर तोडगा निघावा आणि आंदोलकांना आपला विषय मांडून हा विषय सोडविण्याची इच्छा असेल तर त्यांनी निश्चितच चर्चेसाठी यावं,असेही तानावडे म्हणाले.
तरच तोडगा निघेल
शेळ-मेळावलीत काही ठिकाणी लाल बावटे दिसत आहेत. याचा अर्थ तिथे कम्यूनिष्टवालेही दाखल झालेत, असा टोलाही तानावडे यांनी हाणला. एनजीओ आणि विरोधी पक्ष तिथे हस्तक्षेप करणार नाही तेव्हाच हा विषय सुटेल, असेही तानावडे यांनी सांगितले.