भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा गोवा दौरा रद्द !

दिल्लीतल्या व्यस्त कार्यक्रमांमुळं घेण्यात आला निर्णय

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा गोवा दौरा रद्द झाला आहे. नड्डा दोन दिवसांच्या गोवा दौ-यावर येणार होते. सोमवारी त्यांचं आगमन होणार होतं. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी गोवा भाजपनं केली होती मात्र, दिल्लीतल्या व्यस्त कार्यक्रमांमुळं हा दौरा रद्द झाल्याचं सांगण्यात आलंय.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नड्डा यांच्या या गोवा भेटीला राजकीयदृष्टया अधिक महत्व होतं. काही दिवसांपूर्वीच गोव्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीत दिग्गज नेत्यांची बैठक झाली होती. काही दिवसानंतर नुकतीच केंद्रीय मंत्रीमंडळाची फेररचना पंतप्रधान मोदी यांनी केली होती. त्यात गोव्याच्या श्रीपाद नाईक यांना पर्यटन या गोव्यासाठी अत्यंत महत्वाच्या खात्याच्या केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. यानंतर आता जे. पी. नड्डा यांचा दौरा होणार होता.

दरम्यान, गेल्या काही दिवसात विरोधकही भाजपात प्रवेश करत असल्यानं गोव्यात भाजपची वाटचाल प्रगतीपथावर असल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितलं होतं. भाजपमधलं ‘इनकमिंग’ वाढवण्यासाठीही जे. पी. नड्डा यांचा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!