भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस गोवा दौऱ्यावर

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याचं आयोजन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः भाजपाने विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदारपणे सुरू केली असून भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस डी. पुरंदेश्वरी आजपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर दाखल झाल्या.
त्यांनी आल्या आल्या पक्षाच्या विविध पातळीवरील बैठका घेणं सुरू केलं आहे. उद्याही त्या अनेक बैठका घेणार आहेत. विधानसभेची येती निवडणूक स्वबळावर लढून पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा जी यांच्या आदेशानंतर आता भाजपाच्या राष्ट्रीय पातळीवरील विविध नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंनी केलं विमानतळावर स्वागत

डी. पुरंदेश्वरी यांचं विमानतळावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटनसचिव सतीश धोंड, प्रदेश सरचिटणीस एड नरेंद्र सावईकर आदींनी स्वागत केलं. विमानतळावरुन त्या पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो यांना शुभेच्छा देण्यासाठी पोचल्या. तेथे महिला स्वयंसहायता गटाच्या उत्पादन केंद्राचं उद्घाटन त्यांनी केलं. मंत्री मिलिंद नाईक यांच्या उपस्थितीत मुरगाव मंडळ समितीची आणि त्यानंतर वास्को मतदारसंघातील मतदान केंद्र ८ ची बैठक आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या उपस्थितीत त्यांनी घेतली. येत्या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा त्यांनी आढावा घेतला.

भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक

पणजीतील भाजपा कार्यालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचं स्वागत केलं. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक घेत विधानसभेच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला. भाजयुमोच्या प्रदेश समितीशी त्यांनी संवाद साधला. सायंकाळी उशिरा त्यांनी म्हापसा येथे भाजपाच्या उत्तर गोवा समितीची बैठक घेतली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!