गुजरातमधील भाजप आमदाराला जुगार खेळताना अटक

सात महिलांसह 25 जण पोलिसांच्या ताब्यात

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : देशात सध्या कोरोनामुळे नागरिकांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. असं असूनही काही राजकीय नेते कोरोना नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. अशात गुजरातमधील एका भाजप आमदाराला जुगार खेळताना अटक करण्यात आली आहे. पंचमहाल पोलिसांनी कारवाई करत एका आमदारासह अन्य 25 जणांना रंगेहाथ अटक केली आहे. संबंधित सर्व आरोपी आमदाराच्या एका रिसॉर्टमध्ये एकत्र जमून जुगार खेळत होते. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे.

अटक केलेल्या आमदाराचं नाव केसरी सिंह सोलंकी असून ते गुजरातमधील खेडा जिल्ह्याच्या मटर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. काल रात्री केलेल्या छापेमारीत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. जुगार आणि रिसोर्टमध्ये मद्यसाठा ठेवण्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी आमदाराला अटक केली आहे. अवैधरित्या जुगार खेळणं, कोरोना नियम न पाळणं आणि दारू बाळगणे अशा विविध कलमांतर्गत पंचमहाल जिल्हा पोलिसांनी आमदारासह 25 जणांना अटक केली आहे. यामध्ये 7 महिलांचा देखील समावेश आहे.

याप्रकरणी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजदीपसिंग जडेजा यांनी सांगितलं की, पंचमहाल पोलिसांनी गुरुवारी रात्री पावागड शहरालगत असलेल्या एका रिसॉर्टवर छापेमारी केली आहे. या कारवाईत आमदार केसरीसिंग सोलंकी यांच्यासह 25 जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. “आम्हाला सोलंकी आणि इतर 25 जण जुगार खेळताना आढळले असून त्यांच्याकडून दारूच्या बाटल्या आणि कसीनोचं सामान जप्त करण्यात आल्याची माहितीही जडेजा यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पोलिसांनी ही कारवाई केल्यानं गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अडचणी वाढू शकतात.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये 7 महिला आणि 18 पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून 7 मद्याच्या बाटल्याही जप्त केल्या आहेत. वरील सर्व आरोपी आमदारांच्या रिसॉर्टमध्ये जुगार खेळत मद्य पार्टीत गुंग होते. याचवेळी पोलिसांनी हा छापा टाकला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!