अस्तित्व कायम ठेवण्यासाठी भाजप मंत्री, आमदारांची धडपड

पालिका, मनपा निवडणुकीत ओतला जीव

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्य विधानसभा निवडणूक अवघ्या अकरा महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना राज्यात होत असलेल्या अकरा पालिका आणि पणजी महानगरपालिका निवडणुकांत स्वत:चं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी सत्ताधारी भाजपचे मंत्री, आमदार आपापल्या पालिका क्षेत्रांत जीव ओतून काम करत आहेत. पक्षातील स्वत:चं वजन वाढवण्यासाठी स्पष्ट बहुमत मिळवण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत आहे.

हेही वाचाः कुणकेश्वर यात्रेस प्रारंभ; मात्र यावर्षीची यात्रा भाविकाविना

पक्षाचा विश्वास जिंकण्याचे प्रयत्न

म्हापसा, पेडणे, वाळपई, डिचोली, मुरगाव, मडगाव, कुंकळ्ळी, केपे, सांगे, कुडचडे-काकोडा, काणकोण या अकरा पालिका आणि पणजी महानगरपालिका यांपैकी पेडणे, कुंकळ्ळी, केपे, काणकोण आणि पणजी या पाच मतदारसंघांतील आमदार मगो आणि काँग्रेसमधून फुटून भाजपात आले आहेत. यांतील दोघांना पक्षाने उपमुख्यमंत्रीपद, एकाला उपसभापतीपद, तर इतर दोघांकडेही महत्त्वाची पदं दिली आहेत. वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणेही काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे या सर्वच आमदारांनी पुढील विधानसभा निवडणूक केंद्रस्थानी ठेवून पालिका निवडणुकांत आपापल्या पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळवून देऊन पक्षाचा विश्वास जिंकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी ते दिवस-रात्र आपापल्या पालिका क्षेत्रांत तळ ठोकून असल्याची माहितीही प्राप्त झाली आहे.

हेही वाचाः रेती व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारी निश्चित

विजयासाठी धडपड

म्हापसा, डिचोली, मुरगाव आणि कुडचडे-काकोडा येथेही भाजपचेच आमदार आहेत. त्यांनीही पालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठीचे पूर्ण प्रयत्न सुरू ठेवले आहेत. तर सांगे पालिका काबीज करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला शह देण्यासाठी अपक्ष आमदार प्रसाद गावकरही आपल्या समर्थकांच्या विजयासाठी धडपड करत असल्याचेही दिसून येत आहे.

हेही वाचाः सहकार भांडाराच्या निवडणूक स्थगितीस नकार

बाबूशची प्रत्येक प्रभागास भेट

पक्षाने दिलेल्या पॅनेलवरून भाजपच्या पणजीतील निष्ठावंत नेत्यांमध्ये असलेली नाराजी लक्षात घेऊन पणजीचे आमदार बाबूश मॉन्सेरात यांनी पणजी महानगरपालिका स्पष्ट बहुमताने जिंकण्यासाठी प्रत्येक प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या निष्ठावंत नेत्यांनी विरोधात काम केले तरी पॅनेलमधील एकाही उमेदवाराला फटका बसू नये, यासाठी बाबूश प्रत्येकाच्या घरी जाऊन भेटी घेत असल्याचेही दिसत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!