भाजप या ‘सात’ जणांना वगळण्याची शक्यता!

भाजपकडून पात्र उमेदवारांचा शोध सुरू; प्रमुख नेते लागले कामाला

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: काँग्रेस, मगोतून आयात केलेल्या बारापैकी सहा आणि भाजपमधील एका विद्यमान आमदाराला आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. या सात आमदारांत दोन मंत्र्यांचाही समावेश आहे. या सात जणांना तूर्त वगळून भाजपने त्यांच्या मतदारसंघांत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती भाजपच्या अंतर्गत सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

हेही वाचाः मल्ल्या, मोदी, चोक्सी यांची 9,371 कोटींची संपत्ती सरकारी बँका-केंद्राकडं हस्तांतरित

नेत्यांची चाचपणी करण्याचं काम सुरू

पेडणेचे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, वेळ्ळीचे आमदार तथा जलस्रोतमंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स, थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर, कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा, कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस, नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा आणि दक्षिणेतील आणखी एक अशा सात आमदारांचा यांत समावेश आहे. सुमार कामगिरी, जनतेतील असंतोष आणि पक्षविरोधी कारवाया या तीन मुद्द्यांमुळे या सहा आमदारांना पुढील निवडणुकीत उमेदवारी न देण्याचे निश्चित करूनच भाजपने त्यांच्या मतदारसंघातील पक्ष संघटनांवर लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघांत विद्यमान आमदारांना टक्कर देऊ शकणाऱ्या इतर नेत्यांची चाचपणी करण्याचं काम भाजपच्या गाभा समितीने सुरू केलं आहे. त्याची जबाबदारी दोन्ही जिल्ह्यांतील ज्येष्ठ नेत्यांवर दिल्याचंही समजतं.

दिल्लीतील प्रमुख नेते कामगिरीवर समाधानी नाहीत

काँग्रेस आणि मगोतून आलेल्या बारापैकी पाच जणांना भाजपने मंत्रिमंडळात स्थान दिलं होतं. मगोतून आलेल्या आजगावकर तसंच काँग्रेसमधून आलेल्या फिलीप नेरी या दोघांना मंत्रिपदे देऊन दर्जेदार खाती त्यांच्याकडे दिली. पण गेल्या दीड-दोन वर्षांत त्यांनी केलेल्या कामगिरीवर भाजपचे राज्यातील आणि दिल्लीतील प्रमुख नेते समाधानी नाहीत. याशिवाय कामगिरी पूर्णपणे ढासळल्याने नीळकंठ हळर्णकर, क्लाफासियो डायस, विल्फ्रेड डिसा व आणखी एका आमदाराविरोधात त्यांच्याच मतदारसंघांतील नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. एलिना साल्ढाणा यांनी मध्यंतरी केंद्राच्या तीन प्रकल्पांवरून राज्य आणि केंद्र सरकारवर थेट हल्ले चढवले होते. या सर्व कारणांमुळे हे सात आमदार तूर्त भाजपच्या निशाण्यावर आहेत, असं सूत्रांकडून समजतं.

हेही वाचाः Goan Poetry | Special | कवितांची खास मैफल…गोवन काव्यधारा

पुढील दीड ते दोन महिने मोहीम सुरू

कोविड काळात उद्भवलेल्या विविध समस्यांमुळे भाजप सरकारविरोधात बहुतांशी मतदारांत संतापाची लाट होती. अशा परिस्थितीतही बहुतांशी मंत्री, आमदारांनी स्वत:हून पुढाकार घेऊन सरकारला संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. सर्व जबाबदारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या खांद्यावर ढकलून त्यांनी हात वर केले होते. त्याचा फटका या सात आमदारांसह इतरही काही जणांना बसणार आहे. विद्यमान भाजप आमदारांबाबत स्थानिक मतदारांना काय वाटते याचा अंदाज भाजप नेते, पदाधिकारी गुप्त पद्धतीने घेत आहेत. ही मोहीम पुढील दीड ते दोन महिने सुरू राहणार आहे. त्यात जे उत्तीर्ण होतील त्यांचीच उमेदवारी टिकेल. आणि ज्यांच्याविरोधात रोष आहे त्यांना उमेदवारीपासून वंचित रहावे लागणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

हेही वाचाः गोवा पोलिस कॉन्स्टेबल भरती आता 16 जुलैपासून

काहींची राष्ट्रवादीशी बोलणी सुरू

– काँग्रेसमधून भाजपात आलेल्या दक्षिण गोव्यातील ख्रिस्ती आमदारांना आपण भाजपच्या उमेदवारीवर निवडून येणार नाही याची पक्की खात्री आहे. त्यामुळेच त्या आमदारांनी आतापासूनच स्वतंत्रपणे आपली तयारी सुरू केली आहे.
– फुटीर नेत्यांना पुन्हा घेणार नसल्याचे काँग्रेसने जाहीर केल्याने काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी बोलणी सुरू केली आहेत. तर काहीजणांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं आहे. तसं झाल्यास भाजपलाच त्याचा फायदा होईल, असं सूत्रांचं मत आहे.

हेही वाचाः केपेत कारने घेतला पेट; सुदैवाने जिवीतहानी नाही

निर्णय झाल्यानंतरच मगोशी युतीबाबत चर्चा

निवडणुकीत मगो पक्षाशी युती करण्याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. पण उत्तर गोव्यातील ज्या दोन-तीन मतदारसंघांत भाजप आमदार पूर्णपणे अपयशी ठरले आहेत असं व याआधी दक्षिणेत जेथून मगोचे आमदार निवडून आलेले आहेत असे काही मतदारसंघ मगोला सोडण्याचा निर्णय घेऊनच भाजप मगोशी युतीबाबत चर्चा करू शकते. पण यासाठी आणखी काही महिने जातील, असंही सूत्रांनी सांगितलं.

हेही वाचाः ‘तिळारी’ची पातळी वाढली; सावधानता बाळगा!

लोबो, विश्वजीत, बाबूशवर ‘खास’ लक्ष

– मंत्री मायकल लोबो, विश्वजीत राणे यांच्यासह पणजीचे आमदार बाबूश मॉन्सेरात यांच्यावरही भाजपकडून ‘खास’ लक्ष देण्यात येत आहे.
– लोबो आणि विश्वजीत यांनी मध्यंतरीच्या काळात केलेली वक्तव्ये आणि कारवायांमुळे पक्षात नाराजी होती. तर बाबूश मॉन्सेरात कधी काय करतील हे सांगता येत नसल्याने पुढील काही महिने त्यांच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचं पक्षाने ठरवल्याचं समजतं.
– मायकल लोबो आपल्या पत्नीला शिवोली मतदारसंघातून निवडणूक आखाड्यात उतरवू पाहत आहेत. पण पक्षाकडून त्याला मान्यता मिळणं कठीण असल्यानं लोबो वेगळा पर्याय निवडू शकतात, असंही सूत्रांचं म्हणणं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!