प्रवेशाचं बक्षीस! ढवळीकरांना उपनगराध्यक्ष पदाची लॉटरी लागणार?

मगोला सोडचिठ्ठी देत भाजपात आलेल्या वीर ढवळीकरांना लवकरच मोठं पद मिळण्याची शक्यता

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

फोंडा : मगोच्या युवा नगरसेवकाने भाजपात (BJP Goa) प्रवेश केलाय. त्यामुळे गोव्यात पुन्हा एकदा भाजपच्या इनकमिंगची चर्चा रंगली आहे. फोंड्यातील मगोचे युवा नगरसेवक वीर ढवळीकरांनी शनिवारी भाजपात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांच्यासह भाजपचे इतरही नेते उपस्थित होते. आपल्या जवळपास दोनशे कार्यकर्त्यांसह ढवळीकरांनी भाजपात प्रवेश केला.

बातमीवर शिक्कामोर्तब

गोवनवार्तालाईव्ह.कॉमने वीर ढवळीकरांच्या भाजपप्रवेशाचं वृत्त सगळ्यात आधी दिलं होतं. अखेर गोवन वार्ता लाईव्हच्या या बातमीवर शिक्कामोर्तब झालं. मगोला रामराम करत वीर ढवळीकरांनी भाजप प्रवेश केल्यानं साहजिकच फोंडा नगरपालिकेत भाजपची ताकद वाढली आहे.

भाजप जोमात, मगो कोमात

काही दिवसांपूर्वी उप-नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली होती. या निवडणूकीत स्वकीयांच्याच दगाबाजीमुळे भाजपच्या आनंद नाईकांचा पराभव झाला. नाईकांना धूळ चारत मगोपच्या अमिना नाईक उप-नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. या घडामोडीनंतर फोंडा नगरपालिकेतील राजकारणाला वेगळं वळण लागलं. आधी मगोचे नगरसेवक बाबू सावकारांनी भाजप प्रवेश केला. आणि आता मगोचे दुसरे युवा नगरसेवकही भाजपात सामील झालेत.

उप-नगराध्यक्षपदी मगोने मारलेली बाजी त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक फोडून त्यांच्यावरच उलटविण्याची खेळी सद्या भाजप खेळताना दिसत आहे. ह्यात भाजपचे नगराध्यक्ष अपूर्व दळवी यांचा मोठा वाट असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळतेय.

लवकरच उप-नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव?

वीर ढवळीकरांना भाजपा प्रवेश केल्याकेल्याच लॉटरी लागणार असल्याचं बोललं जातंय. आधी ठरल्याप्रमाणे वीर ढवळीकरांना आता भाजप उप-नगराध्यक्षपद देणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून कळतंय. सोमवारी (5 ऑक्टोबर) फोंडा नगरपालिकेच्या उप-नगराध्यक्ष अमिना नाईकांवर अविश्वास ठराव आणला जाण्याची शक्यता आहे. हा अविश्वास ठराव संमत झाल्यात वीर ढवळीकरांची उप-नगराध्यक्षपदी वर्णी लागू शकते. त्यासाठीचं आवश्यक संख्याबळही भाजपने जमवलं आहे. भाजपने आखलेल्या राजकीय खेळीतून फोंडा नगरपालिकेमध्ये नेमकं आता काय घडतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!