भाजप भाजतंय कोविडवर राजकीय पोळी

गिरीश चोडणकरांचा घणाघात

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात एकीकडे कोरोना प्रकरणं वाढत चाललीएत. कोरोना प्रकरणं कमी असताना 144 कलम जारी केलं आणि आत्ता कोरोनाची प्रकरणे वाढत असताना हे कलम मागे घेण्याचं नेमकं प्रयोजन काय,असा सवाल गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केलाय. कोविडची स्थिती मर्यादीत असताना शिगमोत्सव, इस्टर आणि शब-ए-बरात हे पारंपारिक उत्सव बंद ठेवण्यात आले. तिकडे भाजप आमदारांचे वाढदिवस, स्थापना दिवसाचे सोहळे साजरे करण्यात आले. भाजपचे नेतृत्व बहुजन समाजाकडे आले असले तरी भाजप पक्षाची मानसिकता ही बहुजन आणि अल्पसंख्याक विरोधी आहे, हेच यातून प्रतिबिंबित झाल्याचा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला.

पोट उपाशी, सोहळे तुपाशी

एकीकडे राज्य दिवाळखोरीत सापडलंय. खाणबंदीमुळे लाखो लोकांची उपासमार सुरू आहे. कोरोनामुळे अनेकजणांवर आर्थिक संकट ओढवलंय. यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी सरकारकडे काहीच योजना नाही. खाणबंदीतून दिलासा मिळवण्यासाठी केंद्राकडे आर्थिक पॅकेज मागीतले तर त्याला काहीही प्रतिसाद नाही पण गोवा मुक्ती हीरक महोत्सवासाठी मात्र 300 कोटींचं पॅकेज जाहीर होतं. भाजपची ही मानसिकता म्हणजे गोंयकारांची निव्वळ खट्टाच आहे. एकीकडे लोक उपाशी आहेत तर केंद्र सरकारला राज्य सरकारला सोहळे साजरे करण्यासाठी पॅकेज देत आहे,असा टोलाही गिरीश चोडणकर यांनी हाणला. 2012 मध्ये खाणबंदीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे आर्थिक पॅकेज मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी काँग्रेस सरकारच्या विरोधात भाजपने बरेच ढोल वाजवले होते. 2014 पासून आत्तापर्यंत खाण पिडीतांसाठी केंद्रातील भाजप सरकारकडून किती कोटींचं पॅकेज आणलं हे भाजपने जनतेला सांगावं,असे आव्हान चोडणकर यांनी दिलं.

तिजोरी भरण्यासाठीच नवे वाहतूक नियम

सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. ही भरून काढण्यासाठीच या आर्थिक संकट काळात सरकारने नवे वाहतूक नियम लागू केलेत. यापूर्वी रस्त्यांचे काम करू आणि नियम लागू करू,असे सांगणारे सरकार रस्त्यांवरील खड्डे तसेच असताना आता अचानक हे नियम कसे काय लागू करतेय,असा सवाल त्यांनी केला. या कायद्याची मदत घेऊन लोकांचे खिसे कापण्याचे काम हे सरकार करणार अशी टीका गिरीश चोडणकर यांनी केलीए.

रणनिती बदलली पण मानसिकतेचं काय

भाजप हा उच्चवर्णियांचा पक्ष हे जगजाहीर आहे. दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्यानंतर पक्षाची लोकप्रियता ढासळेल या हेतूनेच राज्याचे नेतृत्व डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे देण्यात आलंय. प्रमोद सावंत हे सरकारचा चेहरा असले तरी प्रत्यक्षात सरकार कोण चालवतोय, हे गोंयकारांना माहितीए,असा टोलाही गिरीश चोडणकर यांनी हाणला. बहुजन समाज आणि अल्पसंख्याकांचे महत्वाचे उत्सव असलेले शिगमोत्सव, इस्टर आणि शब-ए-बरात या सणांनाच कोरोनाचे कारण सांगून अटकाव करण्यात आला. या सणांना गर्दी उसळेल याची भिती होती तर आमदाराच्या वाढदिवसाला गर्दी कशी झाली आणि भाजप स्थापना दिवस गर्दी करून कसा साजरा केला गेला,असाही प्रश्न गिरीश चोडणकर यांनी केलाय. भाजपची मानसिकता बहुजन समाजाच्या नेत्याला कधीच मोठं होऊ देणार नाही. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची कोंडी करून त्यांची राजकीय कारकीर्द ह्याच भाजपने संपवली. दुर्दैवाने त्यासाठी बहुजन समाजाच्या नेत्याचाच वापर केला. आता डॉ. प्रमोद सावंत यांचाही पार्सेकर होईल,अशी भविष्यवाणी गिरीश चोडणकर यांनी केलीए.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!