भाजप सरकारचा ‘घोटाळ्यात घोटाळा’

काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकरांची घणाघाती टीका; आयव्हरमेक्टिन गोळ्या गायब

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः कोविड महामारीत ‘आजाराचा बाजार’ करून आपली तुंबडी भरणाऱ्या भ्रष्ट भाजप सरकारने आता आयव्हरमेक्टिन गोळ्यांचा ‘घोटाळ्यात घोटाळा’ केला आहे. गोव्यातील आरोग्य केंद्रात लोकांना मोफत वितरणांसाठी सदर गोळ्या आजपर्यत उपलब्धच नसल्याचं उघड झालं आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब रू. 22.50 कोटींच्या सदर गोळ्या कुठे आणि कशा गायब झाल्या हे स्पष्ट करावं, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

हेही वाचाः एम.वी.आर कंपनीच्या कंत्राटदारने दिली टांग

सगळ्याकडूनच आम्हाला नकारार्थी उत्तर

आज आम्ही गोव्यातील सुमारे पंधरा आरोग्य केंद्राकडे संपर्क साधून सदर गोळ्या उपलब्ध आहेत का याची चौकशी केली. अनेक गावातील लोकांकडे संपर्क साधून सदर गोळ्या त्यांना मिळाल्या का याची आम्ही चौकशी केली. परंतु सगळ्याकडूनच आम्हाला नकारार्थी उत्तर मिळालं. महिला आणि बाल कल्याण खात्याचे कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांनाही आयव्हरमेक्टिन गोळ्यांबद्दल काहीच माहिती नसल्याचं उजेडात आलं आहे, असं गिरीश चोडणकरांची म्हटलंय.

हेही वाचाः अखेर कुडाळकर कुटुंबियांच्या मदतीला जीत आरोलकर पोचले

काँग्रेस पक्षाने दोन्ही वेळा आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेस आक्षेप घेतला होता

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी 10 मे 2021 रोजी घोषणा करुन मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने कोविड आजारावर खबरदारीचे उपचार म्हणून आयव्हरमेक्टिन गोळ्यांचं वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर 17 मे रोजी आरोग्यमंत्र्यांनी महिला आणि बाल कल्याण खात्याचे कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांमार्फत सदर गोळ्या मोफत वाटण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. काँग्रेस पक्षाने दोन्ही वेळा आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेस आक्षेप घेतला होता, याची आठवण गिरीश चोडणकरांनी करुन दिली.

हेही वाचाः रावण गावात फुलले भेंडीचे मळे; दर दिवशी 700 किलो भेंडीची तोडणी

22.50 कोटी आता कुणाकडून वसूल करणार?

काँग्रेस पक्षाने गोमंतकीयांना सदर गोळ्यांचं सेवन आरोग्य चाचणी केल्याशिवाय करू नका असं आवाहन केलं होतं. त्यानंतर लोकांचा रोष पत्करावा लागू नये म्हणून भाजप सरकारने सदर गोळ्या डांबून ठेवण्याचा निर्णय घेतला असावा. तसं असल्यास सदर गोळ्यांच्या खरेदीसाठीचे रु. 22.50 कोटी आता कुणाकडून वसूल करणार, हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करावं, असं गिरीश चोडणकर म्हणालेत.

हेही वाचाः दहावीची परीक्षा रद्द करण्याचा सरकारचा निर्णय धक्कादायक

कुणाच्या सल्ल्याने गोळ्यांच्या वितरणाचा निर्णय?

काँग्रेस पक्षाने जागतिक आरोग्य संघटना आणि वैद्यकीय तसंच विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचा हवाला देऊन सदर गोळ्या आरोग्य चाचणी न करता घेतल्यास जीवाला अपायकारक ठरू शकतात हे लोकांच्या नजरेस आणुन दिलं होतं. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सदर गोळ्यांचं वितरण करण्याचा निर्णय कुणाच्या सल्ल्याने घेतला, ते स्पष्ट करावं. जागतिक आरोग्य संघटनेच्या विरूद्ध भाजप सरकारला सल्ला देणाऱ्या तज्ज्ञांची नावं हिम्मत असेल तर सरकारने लोकांसमोर ठेवावीत, अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

हेही वाचाः मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ देण्याचे संकेत

चाचणी केल्याशिवाय गोळ्या घेऊ नका

काँग्रेस पक्ष मागील कित्येक दिवस सदर गोळ्यांच्या खरेदीसाठी सरकारने निवीदा जारी केली होती का? सदर गोळ्या पुरविण्याचे कंत्राट कुणाला आणि किती रकमेला दिलं याची माहिती उघड करण्याची मागणी करीत आहे. परंतु सरकार मात्र जाणीवपूर्वक सदर माहिती देण्यास टाळाटाळ करतंय, असे गिरीश चोडणकर म्हणाले. गोमंतकीयांनी गोळ्यांची चाचणी केल्याशिवाय तसंच वैद्यकीय सल्ला घेतल्याशिवाय सदर गोळ्यांचं सेवन करू नये, असं काँग्रेस पक्ष लोकांना परत एकदा आवाहन करीत आहे, असे गिरीश चोडणकर म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!