भाजप सरकार हीच गोयकारांसाठी सर्वात मोठी आपत्ती !

आपचे संयोजक राहुल म्हांबरे यांची जोरदार टीका !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात बऱ्याच भागात सुरू असलेली वीजटंचाई सिद्ध करते की भाजपा सरकार पुन्हा एकदा अपयशी ठरले आहे, मात्र सर्व काही सुरळीत व नियंत्रणात असल्याचे मीडियाला खोटे सांगत आहे. तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महामारी, चक्रीवादळ आणि अर्थव्यवस्थेसारख्या विविध आघाड्यांवर सरकार सलग अपयशी ठरल्याने आपचे संयोजक राहुल म्हांबरे यांनी म्हटले आहे की, गोयकारांसाठी सर्वात मोठी आपत्ती भाजप सरकार ही आहे. चक्रीवादळ तौक्तेच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठ्याबाबत सरकारच्या अपयशाचा उल्लेख करतांना म्हांबरे म्हणाले की, “वैद्यकीय कारणास्तव ऊर्जा मंत्री अनुपस्थित असताना उर्जा मंत्रालयाचा प्रभारी म्हणून कोण कार्यरत आहे? हे जाहीर करण्यात यावं.

ऊर्जा मंत्रालयाचा कार्यभार आहे तरी कोणाकडं ?

ते पुढं म्हणतात, आम्ही निलेश काब्राल यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो. परंतु मुख्यमंत्री सावंत यांनी जाहीर केले पाहिजे की, आज वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कोण जबाबदार आहे? गेल्या 72 तासांपासून गोयंकर शांतपणे त्रास सहन करत आहेत. हेल्पलाइन क्रमांक देखील कार्यरत नाहीत. वीजपुरवठाची समस्या दूर करण्यासाठी वीजपुरवठा विभागाशी सरकार मधील कोण व्यक्ती संपर्क साधत आहे? संबंधित विभागाला कोण मार्गदर्शन करून निर्णय घेत आहे आणि पर्यवेक्षण करीत आहे? ” असे म्हांबरे यांनी विचारले.

एका तरी आमदाराच्या घरचा वीजपुरवठा खंडित झाला आहे का?

एका तरी आमदारांच्या घरचा वीजपुरवठा खंडित झाला आहे का? असा सवाल म्हांबरे यांनी केला आणि ते म्हणाले की, सर्वसामान्यांपेक्षा व्हीआयपींचा वीजपुरवठा सुरळीत करण्याला प्राधान्य देण्यासाठी वीज विभागातील कर्मचार्‍यांना वळवले जाऊ नये, याची मुख्यमंत्र्यांनी खात्री करणे आवश्यक आहे. म्हांबरे यांनी चक्रीवादळामुळे होणाऱ्या कचऱ्याची सफाई करण्यात अग्रभागी असलेल्या कामगारांची व त्यांना मदत करणाऱ्या लोकांच्या समर्पणाचे व पराक्रमाचे कौतुक केले.
“अग्निशमन विभाग, गोवा पोलिस, विद्युत विभाग आणि स्वच्छता कामगार यांच्या अथक प्रयत्नांमुळे गोव्यात परिस्थिती काही प्रमाणात पूर्वपदावर झाली. पहिल्या 24 तासांतच शेकडो झाडे व इतर अडथळे रस्त्यावरुन दूर करण्यात आले,” असे म्हांबरे म्हणाले. आपचे नेते वाल्मीकि नाईक यांनी अग्रभागी काम करणाऱ्या कामगारांचे कौतुक केले मात्र दु: ख व्यक्त केले की गोवा पोलिस कर्मचार्‍यांना विना स्वच्छता उपकरणाशिवाय उघड्या हाताने साफ सफाई करावी लागली. स्थानिक आमदार त्यांना किमान स्वच्छतेचे उपकरणे जसे की हातमौजे, रेनकोट आदींची व्यवस्था का करू शकत नाहीत, हे जाणून घेण्याची मागणी नाईक यांनी केली. मुख्यमंत्री सावंत यांनी स्वतः पंतप्रधान मोदींसोबत चक्रीवादळाच्या तयारीच्या बैठकींचे बरेच वृत्त कव्हरेज केले असल्याचे निदर्शनास आणून नाईक यांनी या बैठकीमध्ये नक्की कशाविषयी चर्चा झाली? याची माहिती घेण्याची मागणी केली.

चक्रीवादळ बैठक की मीडिया मॅनेजमेंट?

आम्ही चक्रीवादळाच्या शंभर मैलांच्या परिपेक्षात असताना संपूर्ण गोवा राज्यासाठी केवळ एकच एनडीआरएफ (NDRF) टीम पाठविली गेली. राज्यातील बहुतेक भागात चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी निवारा, गरजेची यंत्रसामग्री, सुरक्षा उपकरणे इत्यादींची व्यवस्था नव्हती. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा चक्रीवादळाच्या परिणामाबद्दल पंतप्रधान मोदींशी संवाद साधण्याची घोषणा केली, परंतु आपत्कालीन मदत, वीजपुरवठा सुरळीत करणे याविषयी काहीही तपशील दिलेला नाही. चक्रीवादळाच्या आधी आणि नंतर झालेल्या या बहुचर्चित बैठकीमध्ये काही महत्त्वाची चर्चा झाली का? की ते फक्त मीडिया मॅनेजमेंट होते?”, असे नाईक यांनी विचारले. म्हांबरे यांनी मागणी केली की, “राज्यभरात सर्वत्र नुकसान झाले असून जिल्हाधिकाऱ्यांनी घर व मालमत्तेचे झालेले नुकसान व त्याचे आकलन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात छावण्या घ्याव्यात. येणाऱ्या पावसाळ्याच्या काळात त्यांची स्थिती आणखी बिकट होईल म्हणून नुकसान भरपाई व मदत तातडीने देण्यात यावी. व त्यांचे त्वरित पुनर्वसन करावे.”

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!