…म्हणून भाजपला उतरती कळा!

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी
पणजी : भाजप सरकारला उतरती कळा लागली असून, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गोमंतकीयांनी काँग्रेस पक्षाची मतांची टक्केवारी 6.32 टक्के वाढवून तसा स्पष्ट संदेश दिला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनभावनेचा आदर करून भ्रष्ट व असंवेदनशील भाजप सरकारचा 2022 विधानसभा निवडणुकीत सपशेल पराभव करून काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी कार्यरत व्हावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी केले आहे.
उत्तर गोवा जिल्हा काँग्रेसच्या विविध गट अध्यक्षांच्या आयोजित केलेल्या पहिल्या गटाच्या बैठकीत ते बोलत होते. भाजप मतविभागणी करण्यासाठी आता नवीन राजकीय पक्ष व संघटना जन्मास घालणार असून, गट समित्यांनी भाजपच्या धूर्त खेळीची लोकांना आताच जाणीव करून द्यावी, असे गिरीश चोडणकर यांनी सांगितले.
खरे-खोटे समजण्यासाठी गोमंतकीय जनता हुशार असून, भाजपच्या उत्सवबाजीला व घोषणांना बळी न पडता गोमंतकीय जनता सत्याचीच साथ देणार, असा विश्वास कामत यांनी व्यक्त केला. सर्व गट अध्यक्षांनी शिस्तीने व पक्षाच्या धोरणांनुसार कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
स्थानिक विषयांवर भर देण्याचा सल्ला
काँग्रेसचे मांद्रे, डिचोली, पणजी, साखळी, वाळपई, मयें, साळगांव, म्हापसा, कुभांरजुवा, थिवी व पर्ये येथील गट अध्यक्ष वा निमंत्रक या बैठकीस हजर होते. सर्व गटाध्यक्षांना सदस्य नोंदणी मोहीम पुढे नेण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगण्यात आले. आगामी काळात पक्षातर्फे आयोजित करण्यात येणारे विविध कार्यक्रम यावर चर्चा करण्यात आली. प्रत्येक मतदारसंघात बूथ समिती निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले तसेच स्थानिक विषयांवर भर देण्याचा सल्ला देण्यात आला.
काँग्रेस पक्ष आज जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावत असून, खरी आकडेवारी व तथ्यांच्या आधारावरच सरकारच्या चुका दाखवीत आहे. गोवा विधानसभा तसेच सार्वजनिक मंचावर जनतेचे विषय काँग्रेस पक्ष प्रभावीपणे मांडत आहे.
– दिगंबर कामत, काँग्रेस विधिमंडळ गट नेते
भाजपने अ-लोकशाही मार्गाने 2017 मध्ये सत्ता काबीज केली. परंतु, जनतेने 2019 मध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी 2.22 टक्के कमी करून, भाजपला जनतेच्या नापसंतीचा योग्य संदेश दिला.
-गिरीश चोडणकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस