भाजपात ‘फॅमिली राज’ नाही, पण गोवा अपवाद ठरू शकतोः फडणवीस

जिंकण्याची क्षमता त्यालाच उमेदवारी!

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना भाजपकडून होणाऱ्या सर्व्हेसह जिंकण्याची क्षमता प्रामुख्याने विचारात घेतली जाईल. विद्यमान २७ आमदारांपैकी ज्यांची कामगिरी खराब आहे, अशांना उमेदवारी दिली जाणार नाही. पण, तसे आतापर्यंत दिसून आलेले नाही, असे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी प्रुडंट वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.

भाजपमध्ये फॅमिली राज नाही

भाजपमध्ये फॅमिली राज नाही. एका घरात किती जणांना उमेदवारी द्यायची याचे काही नियम आहेत. यापूर्वी अशा प्रकारे उमेदवारी दिल्याचे काही अपवाद आहेत. पण गोव्यात स्थिती वेगळी आहे. गोव्यात एका घरात दोन-तीन माणसे आमदार झालेली आहेत. पण, सर्वांनाच उमेदवारी देण्यापासून भाजपने आतापर्यंत स्वत:ला दूर ठेवले आहे. पण, आता असा विषय आल्यास स्थानिक नेत्यांना केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करावी लागेल. आमदार बाबूश मॉन्सेरात आणि त्यांच्या पत्नी जेनिफर मॉन्सेरात विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे त्या दोघांनाही उमेदवारी मिळू शकते. पण हा नियम समजून इतरांनी उमेदवारी मागता कामा नये, असे फडणवीस म्हणाले.

विरोधक नेहमीच अल्पसंख्याकांत भीती पसरवून राजकारण करत आलेत

अल्पसंख्याकांबाबत बोलताना, विरोधक नेहमीच अल्पसंख्याकांत भीती पसरवून राजकारण करत आलेले आहेत. पण त्यांनी अल्पसंख्याकांना कधीही न्याय दिलेला नाही. उलट केंद्र आणि विविध राज्यांतील भाजप सरकारांनी नेहमीच सर्वांना समान न्याय दिला आहे, असे त्यांनी नमूद केले. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या विकासाचा पाया रचून ठेवला आहे. यापुढे आम्हाला त्यावर कळस रचायचा आहे. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व त्यांची टीम हे काम योग्य पद्धतीने करत आहेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, निवडणूक प्रभारी म्हणून नेमणूक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस सोमवारी प्रथमच गोव्यात दाखल झाले. पहिल्याच दिवशी पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर फडणवीस यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सायंकाळनंतर मंत्री आणि भाजप आमदारांची बैठक घेतली. या बैठकीआधीच मंत्री मायकल लोबो आणि दीपक प्रभू पाऊस्कर तसेच मंत्री गोविंद गावडे व पणजीचे आमदार बाबूश मॉन्सेरात यांच्यात सभागृहातच वाद उफाळला. हा वाद टोकाला गेल्याचेही समजते.

पण सर्वांनीच मौनव्रत धारण केलं

दरम्यान, सोमवारी आणि मंगळवारीही पत्रकारांनी या भांडणांसंदर्भात मंत्री, आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पण सर्वांनीच मौनव्रत धारण केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सकाळपासूनच मंत्री, आमदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी सुरू केल्या. सोमवारच्या भांडणात ज्यांचे प्रथम नाव समोर आले होते, त्या मंत्री मायकल लोबो यांची त्यांच्या घरी जाऊन फडणवीस यांनी भेट घेतली. त्यानंतर पणजीत येऊन इतर मंत्री, आमदारांशी चर्चा करत पक्षांतर्गत भांडणे आणि बंडाळीवर ​नियंत्रण आणण्याच्या सूचना त्यांनी सर्वांना केल्याचे समजते.

भाजप मंत्री, आमदारांतील अंतर्गत वाद, भांडणे वारंवार चव्हाट्यावर

भाजप मंत्री, आमदारांतील अंतर्गत वाद, भांडणे वारंवार चव्हाट्यावर येत आहेत. यावर मात करण्यात स्थानिक नेत्यांना अपयश येत आहे. शिवाय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काही मंत्री, आमदारांना न दुखावण्याचा निर्णय स्थानिक नेतृत्वाने घेतला आहे. मंत्री, आमदारांशी चर्चा करून त्यांच्यातील धुसफूस कमी करण्याची पूर्ण जबाबदारी प्रभारी फडणवीस यांच्याकडे सोपवली असून, फडणवीस यांनी मंगळवारपासून त्या कामाला सुरुवातही केली आहे, अशी माहिती भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिली.

युती, उमेदवारीसंदर्भात कोणतंच भाष्य नाही

दरम्यान, प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सर्वच मंत्री आणि आमदारांनी फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याशी चर्चा केल्याचे सांगितले. येत्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून देण्यासंदर्भात फडणवीस यांनी सर्वच मंत्री, आमदारांना काही सूचना केल्या आहेत. युती, उमेदवारीसंदर्भात त्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही, असेही काही आमदारांनी सांगितले.

राजकारणात दुमत होतच असते : फडणवीस

मंत्री, आमदारांतील भांडणांसंदर्भात प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी छेडले असता, एखाद्या ​विषयावर दुमत होणे राजकारणात होतच असते. मंत्र्यांमधील दुमत हा प्रशासकीय विषय आहे. त्याचा संबंध भाजपशी नाही, असे उत्तर त्यांनी दिले. शिवाय भाजपात कोणत्याही प्रकारची बंडाळी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. सावंतच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा यावर शिक्कामोर्तब

मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री झालेल्या डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्या अडीच वर्षांत दर्जेदार, पारदर्शक कारभार केला आहे. डॉ. सावंत पर्रीकरांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासंदर्भात जे उद्गार काढले, त्यावरून येत्या निवडणुकीत डॉ. प्रमोद सावंत हेच पुन्हा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील हे स्पष्ट होते, असेही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!