या पक्षानं दिलेलं गुन्हेगारीमुक्त भाजपचं आव्हान मुख्यमंत्र्यांना पेलणार?

मारहाण प्रकरणी तवडकर दोषी, इतर मंत्री, आमदारही गुन्हेगारीत अडकलेले, आपचा भाजपवर हल्लाबोल

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी

पणजीः राज्यातील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गोवा सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत वारंवार सांगत असतात. मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री व पक्षाचे सदस्य गुन्हेगारी कृत्यांत असल्याचं पाहायला मिळतंय. गोवा भाजपचे राज्य उपप्रमुख, गोवा राज्य अनुसूचित जाती व जमाती कल्याण मंडळाचे अध्यक्ष, भाजपचे माजी मंत्री आणि वरिष्ठ नेते रमेश तवडकर मारहाण प्रकरणात दोषी आढळलेय. चावडी, काणकोण इथं 2017 साली झालेल्या एका मारहाण प्रकरणात तवडकरांना न्यायालयानं दोषी ठरवलंय. त्यामुळं आम आदमी पक्षानं त्यांच्यावर जोरदार टीका करताना राजीनाम्याची मागणी केलीय. आधी भाजपनं आपला पक्ष गुन्हेगारीमुक्त करावा, मगच गोवा गुन्हेगारीमुक्त करण्याची आश्वासनं द्यावीत, असा टोला आपनं हाणलाय.

राजीनाम्याची आपची मागणी

आम आदमी पक्षाचे सदस्य संदेश तेलेकर यांनी सरकारच्या विनोदी विरोधाभासाची खिल्ली उडवलीय. भाजपचे मंत्री आणि पक्षातले वरिष्ठ सदस्य गुन्हेगारी प्रवृत्तींच्या कृत्यांमध्ये गुंतलेले असल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातील गुन्हेगारीवर आळा मिळविण्यात सरकार पुरतं अपयशी ठरलंय. अशा दयनीय स्थितीचा आप पूर्णपणे निषेध करत असून, तवडकरांना आपल्या पदांचा राजीनामा तरी देण्यास सांगावे अशी मागणी आपनं केलीय.

भाजपचे वरिष्ठ नेते, गोवा भाजपचे उपाध्यक्ष आणि राज्य अनुसूचित जाती जमाती विभागाचे अध्यक्ष रमेश तवडकर यांना एका मारहाण प्रकरणामध्ये दोषी ठरविण्यात आलंय. आम आदमी पक्षाच्या गोवा शाखेच्यावतीने मी याचा जाहीर निषेध नोंदवतोय. गोव्यात वाढत असलेल्या गुन्ह्यांबद्दल विचारण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात की त्यांचे सरकार गुन्हे रोखण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यांच्या स्वतःच्या मंत्रिमंडळातले मंत्री आणि पक्षातले सदस्य हे स्वतः गुन्हेगारी कृत्यांमध्ये व तशाप्रकारच्या प्रकारांमध्ये गुंतलेले पाहायला मिळणं आश्चर्यकारक आणि तेवढंच दुर्दैवी आहे.
संदेश तेलेकर, आपचे सदस्य


इतर नेत्यांची कृष्णकृत्यं

यापूर्वीही भाजपचे पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात हे बलात्कार प्रकरणात गुंतलेले होते. या प्रकरणात पीडित असलेली मुलगी काही आठवड्यांपूर्वी ती राहत असलेल्या ठिकाणाहून अचानक गायब झाली. लहान मुलांची अश्लील चित्रफित समाजमाध्यमांद्वारे पसरवाल्याच्या कथित आरोपाखाली सध्याचे नागरनियोजनमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर वादात अडकले होते. कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो एका पंचायतीला एका बेकायदा बांधकाम केलेल्या इमारतीसाठी बनावट सही केल्याच्या प्रकरणामुळे नुकतेच वादग्रस्त ठरल्याचे गोमंतकीयांनी पहिलंय. प्रमोद सावंत यांच्या स्वतःच्या कॅबिनेटमध्येच चारित्र्यावर डाग असलेले व वादग्रस्त मंत्री असल्याचे पाहायला मिळतात. त्यांच्या प्रशासनाचीच परिस्थिती अशी असेल, तर ते गोवा गुन्हेगारीमुक्त कसे बरे करतील? असा प्रश्न आपनं उपस्थित केलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!