विधानसभेसाठी भाजपने कसली कंबर

म्हापशात राज्य कार्यकारिणी बैठक : 15 ऑक्टोबरपासून प्रशिक्षण, पुन्हा भाजपच स्पष्ट बहुमताने निवडून येईल : प्रमोद सावंत

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत राजकीय ठरावांसोबतच नवे शैक्षणिक धोरण आणि आगामी 2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा झाली. येत्या 15 ऑक्टोबरपासून भाजप कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिली.

म्हापसा येथे झालेल्या कार्यकारिणी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawde), उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Babu Kawalekar), बाबू आजगावकर (Babu Azgaonkar) व इतर मंत्री उपस्थित होते. करोना काळात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तरीही राज्यातील सरकारने जनतेला हव्या त्या योजना दिल्या आहेत. विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. सर्वसामान्य जनतेला आवश्यक तेथे मदतीचा हात देण्यात आला आहे. त्यामुळे जनतेचा भाजपवरील विश्वास आणखी बळकट झाला आहे. भाजपने जनतेच्या सेवेचे व्रत स्वीकारले असून, 2022 नंतरही हे व्रत कायम राहील. विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपच स्पष्ट बहुमताने निवडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

राज्य कार्यककारिणी बैठकीला भाजपच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मंत्री, आमदार तसेच कार्यकारिणी सदस्यांनी बैठकीला प्रत्यक्ष हजेरी लावली. इतर कार्यकर्त्यांनी व्हर्च्युअल पद्धतीने बैठकीला उपस्थिती लावली. बैठकीमुळे त्यांच्यातील उत्साहात वाढ होणार आहे. डिसेंबरनंतर स्थगित केलेली नोकर्‍यांची पदे भरली जातील. शिवाय राज्यातील युवकांना मोठ्या प्रमाणात नोकर्‍यांची संधी उपलब्ध करून दिली
जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, बैठकीला संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कोविड काळातील कामगिरीचे कौतुक केले. करोनासारख्या भीषण परिस्थितीत सरकारला विरोधकांनी प्रोत्साहन देणे गरजेचे होते. पण राज्यात मात्र विरोधकांनी करोनाचे राजकारण केले, अशी टीका त्यांनी केली. प्रदेश भाजपने आगामी जिल्हा पंचायत, पालिका आणि 2022 मधील विधानसभा निवडणुका स्पष्ट बहुमताने जिंकण्याचा निर्धार केला असून, त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत. जनतेनेही प्रत्येकवेळी भाजपवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे या तिन्ही निवडणुकांत भाजपचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कृषी विधेयकांवरून मेघवाल यांची टीका
भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram Meghwal) यांनीही दिल्लीतून व्हर्च्युअल पद्धतीने संबोधित केले. केंद्र सरकारने शेतकर्‍यांचे हित आणि दुप्पट उत्पन्न हेच ध्येय ठेवून कृषीविषयक दोन विधेयके संसदेत मंजूर करून घेतली. पण काँग्रेसने मात्र या विषयाचेही राजकारण करत जाणीवपूर्वक विधेयकांना विरोध केला, असा आरोप त्यांनी केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!