भाजपचे ‘हे’ नेते पाच निवडणूक राज्यांची जबाबदारी घेतील; देवेंद्र फडणवीस सांभाळणार गोव्याची धुरा!

येत्या वर्षभरात देशात उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका; 5 राज्यांसाठी भाजपकडून नव्या प्रभारींची नियुक्ती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात वेगळी जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होण्याची देखील शक्यता वर्तवली जात होती. देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्यांमुळे या चर्चेला अधिकच खतपाणी घातलं जात होतं. त्यामुळे फडणवीस आता देशाच्या राजकारणात सक्रीय होतील, असं देखील बोललं गेलं. मात्र, या सर्व चर्चाच ठरल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता भाजपानं देवेंद्र फडणवीसांकडे नवी जबाबदारी सोपवली आहे. पुढील वर्षी गोव्यासोबतच देशभरात इतर चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोव्याची धुरा दिली आहे.

हेही वाचाः ‘आप’ने गोंयकारांच्या नोकरीच्या मागणीसाठी सुरू केली मेगा चळवळ!

वर्षभरात ५ राज्यांच्या निवडणुका!

येत्या वर्षभरात देशात उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपाने आता कंबर कसली आहे. मार्च-एप्रिल-मे या तीन ते चार महिन्यांमध्ये या निवडणुका होतील. त्यासाठी भाजपाने पदाधिकारी आणि जबाबदारी वाटपामध्ये फेरबदल केले आहेत.

या राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपाने नव्या प्रभारींची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी २०२२ सालात होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाची निवडणूक रणनीती आणि इतर सर्व निर्णय प्रक्रिया फडणवीसांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. याआधी बिहार निवडणूक प्रभारी म्हणून फडणवीस यांना पक्षाने जबाबदारी दिली होती. त्या बिहार निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं होतं.

उत्तर प्रदेशची जबाबदारी धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे!

त्यापाठोपाठ इतर चार राज्यांमधले प्रभारी देखील भाजपाने बदलले आहेत. यामध्ये उत्तराखंडची जबाबदारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवली आहे. पंजाबची जबाबदारी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे दिली आहे. मणिपूरसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर उत्तर प्रदेश या राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या राज्याचे प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हा व्हिडिओ पहाः Crime | शिवीगाळ करुन पत्नीला धमकी देत मारहाण

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!