पेडणे नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप

5 जुने चेहरे, 32 नवीन चेहरे

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः पेडणे नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक दहाही प्रभागात चुरस निर्माण झाली असून भाजाप विरुद्ध भाजप असा सामना रंगणारेय. भाजपला पन्नास टक्के यश तर पन्नास टक्के जागा गमवाव्या लागतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. मात्र निवडून आल्यानंतर दहाही नगरसेवक भाजपच्याच गळाला लागून सत्तेत सहभागी होणार आहे.

हेही वाचाः ‘कायद्यांमध्ये दुरुस्ती करून खाणी सुरू करा’

५ जुने, तर ३२ नवीन चेहरे रिंगणात

पेडणे पालिकेच्या निवडणुकीत पाच जुने चेहरे आणि ३२ नवीन चेहरे रिंगणात आहेत. नवीन चेहऱ्यांमध्ये यापूर्वी निवडून आलेले डॉक्टर वासुदेव देशप्रभू, विशाखा गडेकर, माधव सिनाई देसाई, विष्णू साळगावकर यांचा समावेश आहे. मागच्या निवडणुकीत विजयी झालेले उषा नागवेकर, श्रद्धा माशेलकर, श्वेता कांबळी, सिद्धेश पेडणेकर व दीपक मांद्रेकर हे मागच्या पालिका मंडळातील नगरसेवक रिंगणात आहे. या निवडणुकी मामा भाची, जाऊ-जाऊ, भावजय-दीर, भावजय-नणंद, मामा-भाचे-सून अशा जोड्या मतदारांचं लक्ष वेधून घेतायत.

भाजप विरुद्ध भाजप

या निवडणुकीत केवळ भाजप पुरस्कृत पॅनल रिंगणात आहे. भाजपा विरुद्ध अपक्ष अशी लढत होणार असली तरीही भाजप विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होणार आहे. कारण प्रत्येक दहाही प्रभागात भाजपचे एका पेक्षा तीन तीन उमेदवार निवडणुकीसाठी इच्छुक होते, मात्र तिघांपैकी एकाला उमेदवारी दिल्याने दोघेजण नाराज झाले. नाराज झालेले उमेदवार भाजपच्याच उमेदवाराचा पराभव करण्यासाठी रिंगणात उतरलेत. नाराज झालेल्या उमेदवारांची मनं वळवण्यास भाजप नेते आणि स्थानिक आमदार, भाजप मंडळ कमी पडलं. भाजपच्या विरोधात उभे राहिलेल्या उमेदवारांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी आजपर्यंत कोणतेच प्रयत्न झालेले नाहीत. ही लढत भाजप विरुद्ध भाजप अशी रंगणारेय.

हेही वाचा – 22 मार्चला निकाल लावू नका, थोडं थांबा, आमोणकर म्हणतात…

प्रभाग क्रमांक ४ किंवा ७ चा नगरसेवक होऊ शकतो नगराध्यक्ष

प्रभाग क्रमांक ४ मधील भाजपचे उमेदवार उषा नागवेकर आणि प्रभाग क्रमांक ७ मधील डॉक्टर वासुदेव देशप्रभू असे दोन्ही उमेदवार विजयी ठरले तर या दोघांनाही नगराध्यक्ष होण्याची समान संधी आहे. उषा नागवेकर या उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या कट्टर समर्थक आहेत. तशाच त्या डॉक्टर वासुदेव देशप्रभू यांच्याही समर्थक आहेत. मागील निवडणुकीत उषा नागवेकर यांच्या विजयात डॉक्टर वासुदेव देशप्रभू यांचा मोठा वाटा होता, मात्र मागच्या निवडणुकीत वासुदेव देशप्रभू दोन प्रभागातून निवडणुकीसाठी रिंगणात उतरले होते. मात्र ते एकाही प्रभागातून विजयी झाले नाहीत. आता त्यांना प्रभाग ७ मधून निवडणूक जड जाणारेय.

हेही वाचा – Video | Exclusive | नव्या आरक्षणावरुन कोर्टात जाण्याचा दयेश नाईकांचा इशारा

दोन माजी नगराध्यक्ष आमने-सामने

प्रभाग क्रमांक ७ मधील भाजपचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर वासुदेव देशप्रभू यांच्या विरोधात माजी नगराध्यक्ष श्रद्धा माशेलकर यांनी जोरदार आपल्या विजयासाठी जोरदार प्रचार चालू केला आहे. या प्रभागात माशेलकर कुटुंबियांचं वर्चस्व असल्यानं मागच्या पाच निवडणुकीत सलगपणे माशेलकर कुटुंबातील सदस्य निवडून येण्याचा विक्रम केलाय. हा विक्रम आजपर्यंत कुणालाही मोडता आलेला नाही. डॉक्टर वासुदेव देशप्रभू हे प्रभाग क्रमांक ४ मधील रहिवासी आहेत, त्यांचा प्रभाग ओबीसीसाठी आरक्षित केल्यानं देशप्रभू यांनी आपला मोर्चा प्रभाग क्रमांक ७ मध्ये वळविला आहे. या प्रभागात दोन माजी नगराध्यक्षांना ठक्कर देण्यासाठी शिवराम तुकोजी हे रिंगणात असल्याने या प्रभागात चुरस निर्माण झालीये. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – भयंकर! 24 तासांत 4 कोरोना बळी, 4 पैकी तिघांना फक्त कोरोनाची बाधा

आई-कन्या बनल्या नगराध्यक्ष… इतिहास घडला

प्रभाग क्रमांक ७ मधून माशेलकर कुटुंबाला सलग पाचवेळा निवडून येण्याचा मान मिळाला. तीन वेळा निवडून आलेल्या स्व. रेषा माशेलकर या नगराध्यक्ष बनल्या आणि त्यानंतर त्यांच्या प्रभागातून निवडून आलेली त्यांची कन्या श्रद्धा माशेलकर नंतर नगराध्यक्ष बनली. आई-कन्या नगराध्यक्ष होण्याचा मन सर्वप्रथम माशेलकर कुटुंबियांना मिळाला आणि एक नवा इतिहास घडला.

हेही वाचाः ‘सरकराला फक्त निवडणुका जिंकायच्यात, त्यांना कोरोनाचं सोयरसुतक नाही’

प्रभाग 1

प्रभाग क्रमांक १ हा सर्वसाधारण ओबीसीसाठी आरक्षित आहे, यात २१३ पुरुष व २०० महिला मिळून ४१३ मतदार आहेत. गेल्या निवडणुकीत दीपक मांद्रेकर हा विजयी झाला होता. यंदा दुसऱ्यांदा दीपक मांद्रेकर रिंगणात आहेत. आता त्यांना टक्कर देण्यासाठी मनोज हरमलकर, प्रकाश कांबळी, निलेश मयेकर हे एकूण चार उमेदवार रिंगणात आहेत. भाजप पुरस्कृत म्हणून प्रकाश कांबळी आपलं भवितव्य आजमावत आहेत. दीपक मांद्रेकर हे भाजपचे कार्यकर्त्ये, मात्र त्यांना उमेदवारी नाकारून प्रकाश कांबळी उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झालेत.

प्रभाग 2

प्रभाग क्रमांक २ मध्ये एकूण चार उमेदवार रिंगणात आहेत, गेल्यावेळी या प्रभागामधून श्वेता संजीव कांबळी विजयी झाल्या होत्या. यंदा दुसऱ्या वेळी त्या मतदारांचा सामना करताहेत. त्यांना शह देण्यासाठी भाजपने विश्वनाथ तिरोडकर यांना उमेदवारी दिलीये आणि भाजपपासून नाराज असलेल्या पालयेकर कुटुंबियांनी अश्विनी पालयेकर यांना रिंगणात उभं करून जबरदस्त आव्हान भाजपासमोर तयार केलंय, शिवाय चौथा उमेदवार म्हणून नवनाथ मयेकर रिंगणात आहेत. या प्रभागात महिला १९२ व पुरुष १९२ मिळून ३८४ मतदार आहेत, सुरुवातीपासून आश्विनी अरविंद पालयेकर यांनी जबरदस्त या प्रभागात वर्चस्व सध्यातरी प्रस्तापित केलं आहे.

हेही वाचाः खासगी टॅक्सी काऊंटरवरून अस्नोड्यात तणाव

प्रभाग 3

रितू आपुले, प्रार्थना गडेकर, रश्मीता गडेकर, आरती कशाळकर, दिया कशाळकर, राखी कशाळकर व सेजल कशाळकर सर्वाधिक तब्बल सात उमेदवार रिंगणात आहेत. हा प्रभाग ओबीसी महिलासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. एकूण २११ महिला व २३७ पुरुष मिळून ४४८ मतदारांचा सामना करण्यासाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. गेल्यावेळी प्रशांत गडेकर विजयी झाले होते. आता हा महिलांसाठी आरक्षित असल्याने प्रशांत गडेकरांनी त्यांची पत्नी प्रार्थना गडेकरला उभं केलंय. तिला ठक्कर देण्यासाठी तिची जाऊ रश्मीता गडेकर उभी राहिलीये. या प्रभागात बहुरंगी लढत अपेक्षित आहे.

हेही वाचा – VIRAL FACT | चांदेल पेडणेत प्रवाशांचा बसच्या टपावरून जीवघेणा प्रवास

प्रभाग 4

या प्रभागात माजी नगराध्यक्ष उषा नागवेकर व रामा नागवेकर यांच्यात सरळ लढत होणारेय. माजी नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी या प्रभागात विकास कामं केलेली आहेत. गेल्या निवडणुकीत उषा नागवेकर विजयी झाल्या होत्या. २२१ पुरुष व १८५ महिला मिळून ४०६ मतदार या प्रभागात आहे.

प्रभाग 5

नेहा आसोलकर, विशाखा गडेकर व शीतल कळंगुटकर हे तीन उमेदवार या प्रभागात रिंगणात आहेत. विशाखा गडेकर यापूर्वी या प्रभागातून विजयी झाल्या होत्या, शीतल कळंगुटकर यापूर्वी रिंगणात होत्या. आता प्रथमच नेहा आसोलकर रिंगणात नवीन चेहरा आहे, भाजपा पुरस्कृत उमेदवार आहे. ३९८ पैकी १८६ महिला व २१२ पुरुष मतदार आहेत.

प्रभाग 6

प्रभाग क्रमांक सहा हा महिलांसाठी आरक्षित असल्याने माजी उपनगराध्यक्ष गजानन सावळ देसाई यांचा पत्ता कट करण्यासाठी खेळी यशस्वी झालीये. दोन वेळा या प्रभागामधून गजानन सावळ देसाई निवडून आलेत. आता त्यांनी त्यांची पत्नी गीतांजली सावळ देसाई यांना रिंगणात उभं केलं आहे. शिवाय त्यांना शह देण्यासाठी भाजप समर्थक तृप्ती सावळ देसाई आणि सावी सावळ देसाई यांच्यात तिरंगी लढत होणारेय.

प्रभाग 7

हा प्रभाग प्रतिष्ठेचा झालाय. या प्रभागावर तब्बल पाचवेळा माशेलकर कुटुंबियांचं वर्चस्व राहिलंय. माजी नगराध्यक्ष श्रद्धा माशेलकर यांना ठक्कर देण्यासाठी भाजपने माजी नगराध्यक्ष डॉक्टर वासुदेव देशप्रभू यांना उमेदवारी बहाल केलीये. या दोघांना टक्कर देण्यासाठी शिवराम तुकोजी सक्रीय झालेत. डॉक्टर वासुदेव देशप्रभु, श्रद्धा माशेलकर, शिवराम तुकोजी यांच्यात तिरंगी लढत अपेक्षित आहे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एकूण ४२१ मतदार या प्रभागात आहे.

प्रभाग 8

रशेष बोन्द्रे, डॉक्टर साईनाथ चणेककर व माधव सिनाई देसाई हे तीन उमेदवार या प्रभागात उभे आहेत. भाजपतर्फे माधव सिनाई देसाई यांना उमेदवारी दिलेली आहे, गत निवडणुकीत स्मिता कुडतरकर विजयी झाल्या होत्या. एकूण ३९५ मतदार आहेत.

प्रभाग 9

छाया पेडणेकर, प्रताप पेडणेकर, राजन पेडणेकर, सिद्धेश पेडणेकर व तुकाराम तांबोस्कर हे पाच उमेदवार या प्रभागातील ५११ मतदारांचा सामना करणारेत. भाजपतर्फे सिद्धेश पेडणेकर यांना उमेदवारी दिलीये. त्यांना ठक्कर देण्यासाठी त्याच वाड्यावरील ४ उमेदवारांनी सिद्धेश पेडणेकर यांच्या विरोधात वातावरण निर्माण केलं असून त्यांच्या विजयात आडकाठी आणण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत.

प्रभाग 10

जयेश पालयेकर, निलेश पेडणेकर व विष्णू ऊर्फ बाप्पा साळगावकर हे तीन उमेदवार ३७५ मतदारांचा सामना करणारेत. गत निवडणुकीत सुविधा तेली या प्रभागातून विजयी झाल्या आहेत. यंदा विष्णू ऊर्फ बाप्पा साळगावकर यांना भाजपने उमेदवारी दिलीये. त्यांच्यासमोर जयेश पालयेकर व निलेश पेडणेकर यांनी कडवे आव्हान उभे केलेय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!