ACCIDENT | दुचाकीवरील ताबा सुटल्याने झाला स्वयंअपघात

पर्वरीत दुचाकी चालकावर काळाचा घाला; एक जखमी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात अपघातांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. खराब रस्त्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असल्याचं आढळून आलंय. तोर्डा-पर्वरीत एक स्वयंअपघातात अपघात झाला. या अपघातात चालकाला मरण आलंय.

कसा झाला अपघात

पर्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार रात्री ८.१५ वाजता तोर्डा-पर्वरीत स्वयंअपघात झाला. दुचाकी चालक विशाल सोनार आणि त्याचा मित्र युवराज दुचाकीवरून जात होते. पर्वरीतील संजय स्कूल इथून ते आपल्या रूमच्या दिशेने चालले होते. यावेळी तोर्डा – पर्वरी येथील उतरावर पोहचताच विशालचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्याच्या दुचाकीने रस्त्याच्या बाजूला असलेल्या भिंतीला जोरदार धडक दिली. या अपघातात विशाल आणि युवराज गंभीर जखमी झाले.

दुचाकीचालकाचा मृत्यू

अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी अपघाताच्या ठिकाणी गर्दी केली. वेळ न घालवता दुचाकी चालक विशाल तसंच युवराजला बांबोळीतील जीएमसीत उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण इस्पितळात पोहोचण्याअगोदरच विशालचा मृत्यू झाला. जीएमसीत पोहोचताच डॉक्टरांनी विशालला मृत घोषित केलं. तर दुचाकीच्या मागे बसलेल्या युवराज सोनार याच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहे.

हेही वाचाः ACCIDENT | कारचा अपघात; दोघे जखमी

अनैसर्गिक मृत्यू

दुचाकी चालक विशाल सोनार (१९) हा मूळ नेपाळचा. तो कामाच्यानिमित्ताने पर्वरीत भाड्याच्या खोलीत राहात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पर्वरी पोलिस उपनिरीक्षक प्रतीक भट यांनी विशालच्या मृत्यूची नोंद अनैसर्गिक मृत्यू म्हणून केली आहे. दरम्यान सोमवारी विशाल याच्या मृतदेहावर शवचिकित्सा करून मृतदेह अंतिम संस्कारासाठी कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

हेही वाचाः नकोसा विक्रम! रस्ते अपघातात जगात भारत पहिल्या क्रमांकावर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!