बिहार निवडणुकांसाठी गोवा आयआरबी पोलिसांच्या जिवाशी खेळ?

कमांडरची मर्जी, पोलिसांचा जीव खर्ची? गोव्यातील आयआरबी पोलिसांच्या नियुक्ती पत्रावर गरज पडेल तेव्हा कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोनच राज्यात सेवा बजावावी लागेल असं नमूद करण्यात आलंय.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : बिहारच्या विधानसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गोवा आयआरबी पोलिसांच्या 4 तुकड्या पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्राकडून अशा आशयाचे पत्र आयआरबी कमांडार कार्यालय आल्तिनो आले आहे. मात्र गोवा आयआरबी पोलिस कोवीड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर बिहारला जाण्यास तयार नाहीत.

बिहार निवडणुकीसाठी गोव्याची फौज
बिहारमधील 243 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक कर्याक्रम जाहीर झालाय. 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यात बिहार निवडणूक होतेय. बिहारमध्ये सध्या करोनाचा थैमान पसरलाय. अधिकृत आकडेवारीप्रमाणे बिहारमध्ये आतापर्यंत 1 लाख 88 हजार 168 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर 915 रुग्ण दगावले आहेत. दररोज ही संख्या वाढते आहे. बिहारमधील एकंदर आरोग्य व्यवस्था देशातली इतर राज्यांपेक्षा खूप कमकुवत आहे. तिथे करोनाची स्थिती याहून बिकट असण्याची शक्यता आहे.

आदेश रद्द करण्याची मागणी
गोवा आयआरबीच्या 4 तुकड्या म्हणजे 240 पोलिस होतात. निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी गेल्यानंतर जर कोणाला करोनाची बाधा झाली तर त्यामुळे अनेकजणांना संसर्ग होऊ शकतो. एकाला बाधा झाली तर सर्वांवर करोनाचे संकट उद्भवेल. गोव्याच्या तुलनेत बिहारमध्ये आरोग्य यंत्रणा एकदम बिकट आहे. अशा परिस्थितीत ते कुठे राहतील? तिथे त्यांची नीट सोय होईल का? आपली सेवा बजावून आल्यावर त्यांच्यामुळे त्यांच्या घरच्यांना बाधा होण्याचा धोका आहे. त्यामुळे आयआरबी पोलिसांच्या पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यात लक्ष घालावे आणि हा आदेश त्वरती रद्द करावा अशी मागणी आयआरबी पोलिसांच्या पालकांनी केली आहे.

गोव्यातील आयआरबी पोलिसांच्या नियुक्ती पत्रावर गरज पडेल तेव्हा कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोनच राज्यात सेवा बजावावी लागेल असं नमूद करण्यात आलंय. मात्र गोव्यातील आयआरबी पोलिसांना या दोन राज्यांव्यतिरीक्त इतर राज्यांतही पाठवलं जातं. त्यामुळे मुख्यमंत्र्यानी याप्रकरणी लक्ष घालावं अशी मागणी गोवा आयआरबी पोलिसांच्या पालकांनी केली आहे.

कमांडरची मर्जी, पोलिसांचा जीव खर्ची
‘कमांडर वर्ग आपल्या वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी आयआरबी पोलिसांचा वापर करतात. आयआरबी पोलिसांची नावे ड्युटीसाठी पुढे पाठवतात. त्यांचा मागे पुढे विचार करत नाहीत. या कोरोना महामारीच्या काळात एवढ्या मोठ्या संख्येने आयआरबी पोलीसांना बिहारमध्ये पाठवणं योग्य नाही. पाहिजे तर त्यांना पुढच्या वेळी ड्युटीवर घालावं’, अशी मागणी पालकांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!